Team India bowling coach: पाकिस्तानच्या खेळाडूंना ट्रेनिंग देणारा प्रशिक्षक गंभीरच्या नजरेत भरला, 'हा' परदेशी कोच टीम इंडियाच्या बॉलर्सना घडवणार?
team india assistant coach:गेल्यावर्षी पाकिस्तानला ट्रेनिंग दिली, गंभीरच्या नजरेत भरलेला मॉर्ने मॉर्केल आता टीम इंडियाचा बॉलिंग कोच होणार का? अभिषेक नायर आणि रायन टेन डोस्काटे यांचा गौतम गंभीरच्या साहाय्याकांमध्ये समावेश
मुंबई: ट्वेन्टी-20 विश्चचषक स्पर्धेचे जेतेपद जिंकल्यानंतर आता टीम इंडिया नव्या मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. आता भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. गौतम गंभीरने (Gautam Gambhir) नुकतीच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची (Team India Coach) सूत्रे स्वीकारली होती. मात्र, त्याच्यासोबत असलेल्या इतर सहकाऱ्यांची निवड होऊ शकली नव्हती. त्यामुळे टीम इंडियाचे नवीन गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि फलंदाजी प्रशिक्षक कोण असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. यापैकी टी. दिलीप यांना भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, अभिषेक नायर (Abhishek Nayar) आणि रायन टेन डोस्काटे (Ryan Ten Doeschate) यांचा गौतम गंभीरच्या साहाय्याकांमध्ये समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे.
तर टीम इंडियाचा नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून तिघांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज विनय कुमार, लक्ष्मीपती बालाजी, झहीर खान आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केल यांचा समावेश आहे. या सगळ्यांमध्ये मॉर्ने मॉर्केलचे पारडे जड मानले जात आहे. टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मॉर्ने मॉर्केलची निवड झाल्यास 10 वर्षांनी भारतीय संघाला परदेशी गोलंदाजी प्रशिक्षक मिळेल. मॉर्ने मॉर्केलने गेल्यावर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेवेळी पाकिस्तानी संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले होते. मात्र, आता भविष्यात हाच मॉर्ने मॉर्केल भारतीय गोलंदाजांना घडवण्याची दाट शक्यता आहे.
अभिषेक नायरची निवड टीम इंडियासाठी गेमचेंजर ठरणार का?
अभिषेक नायर हा श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियासोबत जाणार आहे. अभिषेक नायरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षक म्हणून नाव कमावले आहे. चाणाक्ष आणि प्रेरणादायी कोच अशी त्याची प्रतिमा आहे. दिनेश कार्तिक आणि रिंकू सिंह यांच्या यशात अभिषेक नायरचे मोठे योगदान असल्याचे सांगितले जाते. दिनेश कार्तिक वैयक्तिक जीवनात कठीण कालखंडातून जात होता तेव्हा अभिषेक नायरनेच त्याला साथ दिली होती. आतादेखील कोलकाता नाईट रायडर्सच्या अकादमीत अभिषेक नायरने अनेक युवा खेळाडुंना घडवले. त्यामुळे अभिषेक नायरला साहाय्यक प्रशिक्षक म्हणून समाविष्ट करुन घेण्यासाठी गौतम गंभीर आग्रही होता, असे समजते.
आणखी वाचा
भारतीय फुटबॉल टीमला मिळाला नवा प्रशिक्षक, विराट कोहलीचं नुकसान; नेमकं कारण काय?
ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सला करणार गुडबाय?; 'गुरु'च्या संघाकडून खेळण्याची शक्यता, महत्वाची अपडेट समोर