ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
ODI World Cup 2027 Direct Dualification : क्रिकेटच्या इतिहासात एकेकाळी जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडिज संघाची सध्याची अवस्था पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनली आहे.

ODI World Cup 2027 Direct Dualification : क्रिकेटच्या इतिहासात एकेकाळी जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडिज संघाची सध्याची अवस्था पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनली आहे. 2 वेळा वनडे वर्ल्ड कप, 2 वेळा टी-20 वर्ल्ड कप आणि एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजला आता 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी थेट पात्रता मिळवता आलेली नाही. अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत 3 विकेट्सने विजय मिळवत थेट वर्ल्ड कपमध्ये प्रवेश निश्चित केला आणि त्याचबरोबर वेस्ट इंडिजच्या आशांवर पाणी फेरले. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या 2027 वनडे वर्ल्ड कपसाठी थेट पात्र ठरण्याच्या शर्यतीत वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे. आता कॅरेबियन संघाला वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवण्यासाठी क्वालिफायर स्पर्धेचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे. विशेष म्हणजे, वेस्ट इंडिजसारख्या पाच आयसीसी ट्रॉफी जिंकलेल्या संघासाठी ही परिस्थिती अत्यंत धक्कादायक आहे. कारण 2019, 2023 आणि आता 2027 अशा सलग तीन वनडे वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजला थेट पात्रता मिळवता आलेली नाही.
अफगाणिस्तानचा विजय अन् वेस्ट इंडिजला धक्का
सोमवारी, 10 ऑगस्ट रोजी बेलफास्टमध्ये आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा वनडे सामना झाला. या सामन्यात अफगाणिस्तानने 3 विकेट्सने बाजी मारली. या विजयासह अफगाणिस्तानने 2027 वनडे वर्ल्ड कपसाठी थेट पात्रता मिळवली. या सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजच्या थेट पात्रतेच्या आशा कायम होत्या. मात्र, अफगाणिस्तानने आयर्लंडला पराभूत केल्यामुळे वेस्ट इंडिजच्या थेट प्रवेशाची शक्यता पूर्णपणे संपुष्टात आली. वेस्ट इंडिजला थेट पात्रता मिळवण्यासाठी आयर्लंडने अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत किमान 4-1 किंवा 5-0 असा विजय मिळवणे आवश्यक होते. मात्र, पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर अफगाणिस्तानने उर्वरित दोन्ही सामने जिंकले. त्यामुळे वेस्ट इंडिजचा खेळ बिघडला.
आयर्लंड 206 धावांत गारद
तिसऱ्या वनडेत अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी आयरिश फलंदाजांवर सातत्याने दबाव ठेवला. आयर्लंडचा संपूर्ण संघ 46.3 षटकांत 206 धावांवर ऑलआऊट झाला. गॅविन होएने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानकडून एएम गझनफर आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेत आयर्लंडच्या फलंदाजीची कंबर मोडली. त्यांच्या अचूक गोलंदाजीमुळे आयर्लंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
गुरबाजची शानदार खेळी, अफगाणिस्तानचा विजय
207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात फारशी सोपी नव्हती. मात्र, सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाजने जबाबदारी स्वीकारत 71 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. गुरबाजच्या खेळीत 2 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या शानदार खेळीमुळे अफगाणिस्तान लक्ष्याच्या जवळ पोहोचला. अखेर अफगाणिस्तानने 44.5 षटकांत 7 विकेट्स गमावत 207 धावा करत सामना आपल्या नावावर केला. या विजयासह अफगाणिस्तानने केवळ आयर्लंडला पराभूत केले नाही, तर 2027 वनडे वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेशही निश्चित केला.
2027 वर्ल्ड कपमध्ये कोणते संघ थेट खेळणार?
आतापर्यंतच्या पात्रता समीकरणानुसार 2027 वनडे वर्ल्ड कपच्या मुख्य स्पर्धेत थेट प्रवेश मिळवणाऱ्या संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. याशिवाय यजमान म्हणून दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांचे स्थान आधीच निश्चित आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिजला आता क्वालिफायरच्या माध्यमातून वर्ल्ड कपचे तिकीट मिळवावे लागणार आहे.
हे ही वाचा -




















