(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat Kohli: नवजोत सिंह सिद्धूंचा मोठा दावा, विराट कोहली भारताचा सर्वोत्कृष्ट फलंदाज
Navjot Singh Sidhu Praised Virat Kohli : रनमशीन विराट कोहलीने वानखेडेवर 50 वे शतक ठोकले. न्यूझीलंडविरोधात उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने शतकी तडाखा दिला.
Navjot Singh Sidhu Praised Virat Kohli : रनमशीन विराट कोहलीने वानखेडेवर 50 वे शतक ठोकले. न्यूझीलंडविरोधात उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने शतकी तडाखा दिला. शतकांचे अर्धशतक ठोकल्यानंतर विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होतोय. क्रिकेट, सेलिब्रेटी ते राजकारण्यांनीही विराट कोहलीचे कौतुक केलेय. भारताचा माजी खेळाडू आणि सध्याचे राजकीय नेते नवजोत सिंह सिद्धू याने विराट कोहलीचे कौतुक केलेय. सिद्धू यांनी ट्वीट करत कोहली जगातील सर्वात महान खेळाडू असल्याचे म्हटलेय.
सिद्धू यांचं नेमकं ट्वीट काय ?
मागील पाच दशकापासून मी भारतीय क्रिकेटचा साक्षीदार आहे. विराट कोहली हा आतापर्यंतचा सर्वात महान फलंदाज आहे, असा माझा विश्वास आहे. तो दबावाखाली सावरतो, धावांचा पाठलाग करताना बहुतेक सामने जिंकण्याचा प्रयत्न करतो. हा मोठ्या सामन्यासाचा खेळाडू आहे. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्स, देशांतर्गत आणि परदेशी परिस्थितींमध्ये उल्लेखनीय कामगिरी आणि सातत्य आहे. उत्तम तंदुरुस्ती त्याला यासाठी अधिक मदत करते, असे सिद्धू यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
पृथ्वीपासून चंद्राचे अंतर हा उंचीचा नाही तर दृष्टीकोनाचा भाग आहे. त्याची खेळाप्रती असलेली जिद्द, चिकाटी अन् मानसिकता अनेकांना आदर्शवत आहे. विराट कोहली सध्या जगभरातील कोट्यवधी तरुणांसाठी रोल मॉडेल आहे. आज विराट विश्वचषकात Hercules flexing सारखा ताकदीने उभा आहे, असे म्हणत सिद्धू यांनी विराट कोहलीचे कौतुक केलेय.
Having been witness to Indian cricket for the last five decades I am of the considered opinion that Virat Kohli is the greatest Indian batsman ever … thrives under pressure , most of his match winning efforts chasing against odds - big occasion player ! … adaptability to all…
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) November 16, 2023
भारत चौथ्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये -
वानखेडेवर न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने चौथ्यांदा वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. यंदाच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला. भारताने आतापर्यंत दोन वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. चाहत्यांना तिसऱ्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. वानखेडेवर भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. यामध्ये विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शतके झळकावली. मोहम्मद शमीने 7 विकेट घेतल्या. भारतायी संघ तिसऱ्या विश्वचषक उंचवणार का? याकडे जगभरातील चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
शतकांच्या अर्धशतकानंतर विराट काय म्हणाला ?
ग्रेट-महान माणसाने नुकतंच माझे अभिनंदन केलं. हे सर्व एका स्वप्नासारखं वाटतंय. पण हे सत्य आहे आणि ते माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. आमच्यासाठी हा सर्वात मोठा सामना आहे. मी माझी भूमिका पार पाडलीच. पण माझ्यासोबतच्या सहकाऱ्यांनाही आपली कामगिरी चोख बजावता आली. माझी टीम जिंकणं हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे, हे मी वारंवार सांगत आलोय. एक बाजू लावून धरणं आणि शेवटपर्यंत खेळत राहणं ही जबाबदारी या स्पर्धेत माझ्यावर दिली आहे. परिस्थितीनुसार खेळणे आणि टीमच्या गरजेनुसार खेळणे हीच माझ्या सातत्यपूर्ण कामगिरीची गुरुकिल्ली आहे. शतकांचं अर्धशतक झळकावताना समोर साक्षात क्रिकेटचा देव अर्थात सचिनपाजी असणं हे स्वप्नवतच आहे. माझी आयुष्याची सोबती आणि माझा हिरो सगळे माझ्या समोर बसलेले होते. शिवाय वानखेडेवर बसलेले सगळे क्रिकेटचे चाहते...हे सगळं शब्दात मांडणं कठीण आहे. इथवर मजल मारण्याचं बहुतांश क्रेडिट हे श्रेयस अय्यरला द्यावंच लागेल. शुभमन गिलला क्रॅम्प आल्यानंतर अय्यर जबरदस्त खेळला. के एल राहुलने तर त्याच्या स्टाईलने चौकारांची बरसात करुन, शेवट केला. 400 चा टप्पा गाठणं जबराट आहे.