U19 World Cup Final: "मला धोनी सर आणि CSK ला..."; फायनलपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूचं मोठं वक्तव्य
U19 World Cup : फायनलपूर्वी भारतीय युवा संघाचा स्टार विकेटकिपर आणि फलंदाज अरावेली अवनीश राव यांनं धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
Team India vs Australia Final: अंडर 19 वर्ल्डकपची फायनल (U19 World Cup Final) आज टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात खेळवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑसी संघानं रोहित-विराटच्या हातून खेचून नेलेल्या वर्ल्डकपचा बदला घेण्याची संधी भारतीय युवा संघाकडे आहे. त्यामुळे टीम इंडियाकडून 140 कोटी भारतीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. अशातच टीम इंडिया कांगारूंना धूळ चारून चीतपट करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच फायनलपूर्वी भारतीय युवा संघाचा स्टार विकेटकिपर आणि फलंदाज अरावेली अवनीश राव यांनं धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. धोनी सर आणि सीएसकेला गौरव वाटावा असं काहीतरी मला करायचं आहे, असं अरावेली अवनीश राव (Aravelly Avanish Rao) म्हणाला आहे.
अरावेली अवनीश रावनं ऑस्ट्रेलिया विरोधात रविवारी खेळवण्यात येणाऱ्या अंडर-19 वर्ल्डकपमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवण्यासाठी सज्ज आहे. पण त्यानं वर्ल्डकप फायनलनंतरच्या त्याच्या प्लानबाबतही सांगितलं. वर्ल्डकप फायनलनंतर अरावेली अवनीश राव पिवळ्या जर्सीत धोनीला अभिमान वाटेल, अशी कामगिरी करण्याच्या तयारीत आहे.
भारतीय संघाचा विकेटकीपर-फलंदाज अरावेली अवनीश राव, जो अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे, तो अशा काही खेळाडूंपैकी एक आहे ज्यांच्याकडे इतक्या लहान वयात आयपीएल करार झाला आहे. त्याला महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने गेल्या महिन्यात आयपीएल लिलावात 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केलं होतं.
"सीएसकेनं मला निवडलं, विश्वासच बसला नाही"
अंडर 19 वर्ल्डकपमध्ये अनेकदा अरावेली अवनीश रावच्या रुपात कॅप्टन कूल धोनीच मैदानात अवतरल्याचा भास अनेकांना झाल्याचं पाहायला मिळालं. एका मुलाखतीत अरावेली अवनीश राव म्हणाला की, "मला विश्वासच बसला नव्हता की, सीएसकेनं मला निवडलं. या गोष्टीवर विश्वास ठेवायलाच मला खूप वेळ लागला. मी तेव्हा घरातच होतो आणि माझा फोन सारखा वाजत होता." पुढे बोलताना तो म्हणाला की, "पण मला धोन सर आणि सीएसकेला माझा अभिमान वाटेल, असं काहीतरी करायचं आहे. सध्या मी आयपीएलबाबत अजिबात विचार करत नाही. फायनलनंतर मी पूर्णपणे आयपीएलचा विचार करणार आहे. पण सीएसके आणि धोनी सरांच्या नेतृत्त्वात खेळण्याचं प्रत्येक क्रिकेटरचं स्वप्न असतं. माझ्यासाठी हे सर्व स्वप्न सत्यात उतरण्यासारखं आहे."
अरावेली पुढे म्हणाला की, "मला लहानपणापासूनच क्रिकेटर बनायचं होतं. माझे वडील सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत, पण ते क्रिकेटचे शौकीनदेखील आहेत. त्यांच्यासोबत बसून मॅच पाहता पाहता मलाही क्रिकेटची गोडी लागली."
टीम इंडिया सहाव्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरण्यासाठी सज्ज
भारताच्या युवा संघाचा कर्णधार उदय सहारनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला नमवून सहाव्यांदा विजेतेपदावर नाव कोरण्याचा प्रयत्न असेल. गेल्यावर्षी 19 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियन संघानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ भारतीय संघाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला नमवत जेतेपद मिळवलं होतं. त्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न उदय सहारनच्या संघाकडे असेल. सेमीफायनलमध्येही टीम इंडियानं गेलेला सामना पुन्हा आपल्या हातात घेतला आणि दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव करुन फायनलमध्ये मोठ्या थाटात एन्ट्री घेतली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याचा खरा हिरो ठरला मराठमोळा सचिन धस. या पठ्ठ्यानं तब्बल 95 चेंडूत 96 धावा ठोकल्या.
मागे वळून पाहिलं तर टीम इंडियाचा अंडर-19 च्या फायनलचा रेकॉर्ड उत्तम आहे. यापूर्वी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोनदा आयसीसी अंडर-19 वर्ल्डकपच्या आमने-सामने आले आहेत. टीम इंडियानं दोन्ही वेळा वियजी पताका फडकावली आहे. अशातच संपूर्ण देशवासियांचं लक्ष टीम इंडियाकडे लागलं असून भारतीय युवा संघानं सहाव्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी आपल्या नावावर करावी अशी सर्वांचीच इच्छा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :