Rohit Sharma on future of ODI cricket: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनं (Ben Stokes) एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा घेतली आणि या फॉरमॅटच्या भवितव्याबद्दल क्रिकेट कॉरिडॉरमध्ये प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. नुकतंच भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी टी-20 लीग क्रिकेटचा उदय आणि विकासामुळं एकदिवसीय क्रिकेटचं अस्तित्व धोक्यात असल्याचं रोखठोक मत व्यक्त केलंय.यानंतर भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) यावर भाष्य केलंय. रोहितच्या मते एकदिवसीय क्रिकेटचं भवितव्य धोक्यात येणार नाही. तसेच क्रिकेट पंडीतांचा एकदिवसीय फॉरमेटबद्दलचा अंदाज चुकीचा असल्याचं तो स्पष्टपणे बोलला आहे. 


एकदिवसीय क्रिकेटच्या भवितव्याबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, एकदिवसीय क्रिकेटचे भवितव्य पूर्णपणे सुरक्षित आहे. रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातलीय, ज्याचं श्रेयही त्यानं एकदिवसीय क्रिकेटला दिलंय. “मी कधीही म्हणू शकत नाही की एकदिवसीय क्रिकेटचं भवितव्य धोक्यात आहे. तसेच मी देखील म्हणू शकत नाही की, टी-20 किंवा कसोटी क्रिकेट संपण्याच्या जवळ आहे."


मोईन अलीचा धक्कादायक दावा
इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर मोईन अलीनं एकदिवसीय क्रिकेटला क्रिकेटपटू वैतागले असल्याचा दावा त्यानं केला होता. तसेच पुढील काही वर्षात एकदिवसीय क्रिकेट ऐवजी टी-20 क्रिकेट खेळण्याला प्राधान्य दिलं जाईल. 


एकदिवसीय क्रिकेटबाबत कपिल देवकडून चिंता व्यक्त
कपिल देव यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्ड आणि द एजला सांगितलं की, “मला वाटते की एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट हळूहळू लुप्त होत आहे. सध्या क्रिकेटची स्थिती युरोपातील फुटबॉल लीगप्रमाणे झालीय. तिथं फुटबॉलच्या द्विराष्ट्रीय स्पर्धा होत नाहीत. चार वर्षांतून एकदाच विश्वचषक होतो. आयसीसीनं वेळीच हस्तक्षेप केला नाही तर, भविष्यात क्रिकेटही अशाच प्रकारे खेळले जाईल. एकदिवसीय क्रिकेट फक्त विश्वचषकापुरतंच मर्यादित राहील. इतरवेळी फक्त टी-20 क्रिकेट खेळवलं जाईल."


ऑस्ट्रेलियात रंगणार आगामी टी-20 विश्वचषक
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल. 


हे देखील वाचा-