मुंबई, 4 जून 2025 : भारतीय संघाचा ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टी-20 मुंबई लीग 2025 च्या पहिल्याच दिवशी 25 चेंडूंत वादळी अर्धशतक झळकावले. पण, साईराज पाटीलने वादळी खेळी करताना इगल ठाणे स्ट्रायकर्सला डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे झालेल्या लढतीत ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टवर पाच विकेट्स राखून विजय मिळवून दिला.  प्रथम फलंदाजी करणाऱ्या ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टसाठी  सूर्यकुमार (50) आणि जिगर राणा (53) यांनी चांगली खेळी केली. त्याच्या जोरावर नाईट्सने 7 बाद 179 धावा केल्या. संघाला अपेक्षित सुरुवात करता आली नाही, परंतु राणा आणि परिक्षित वलसंगकर यांनी 88 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून डाव सावरला. राणा संथ चेंडूवर बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात परिक्षित धावबाद झाला, तेव्हा सूर्यकुमारने संघाची सूत्रे हाती घेतली. 

भारताच्या या स्टार खेळाडूला जय जैन (24) ची चांगली साथ मिळाली. या जोडीने मधल्या षटकांमध्ये 40 धावा जोडल्या आणि डाव स्थिर ठेवला. अमित पांडेने ही जोडी तोडली आणि यष्टीरक्षक अनिश चौधरीने जैनला यष्टिचीत केले.  सूर्यकुमारने डेथ  ओव्हर्समध्ये सुरेख फटकेबाजी करून नाईट्सना मजबूत फिनिशिंगपर्यंत पोहोचवले.

प्रत्युत्तरादाखल, वरुण लवांडेने 38 चेंडूत 57 धावा करत स्ट्रायकर्सचा पाठलाग सुरू ठेवला आणि अर्ध्या धावसंख्येपर्यंत त्यांना 89/1 अशी मजबूत धावसंख्या गाठून दिली. अनिश (37) सोबत त्याने 73 धावांची भागीदारी करून एक भक्कम पाया रचला, परंतु नाईट्सने दोन जलद विकेट्स घेतल्यानंतर हा वेग काही काळासाठी कमी झाला. साईराज पाटीलच्या येण्याने स्ट्रायकर्स स्पर्धेत टिकून राहिले आणि त्याने 22 चेंडूत नाबाद 47 धावा करताना चार षटकार मारले आणि त्याच्या संघाचा विजय निश्चित केला.

सोबो मुंबई फाल्कन्स, एमएससी मराठा रॉयल्स यांचा विक्रमी विजय

यापूर्वी, डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात, सोबो मुंबई फाल्कन्सने आर्क्स अंधेरीचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. फाल्कन्सचा डाव सुरू होण्यापूर्वीच पावसाने खोडा घातला होता. फलंदाजीसाठी आलेल्या फाल्कन्सचा खेळ थांबला, तेव्हा त्यांच्या 1 बाद 26 धावा झाल्या होत्या. सलामीवीर इशान मुलचंदानी (5 चेंडूत 8) याला आर्क्स अंधेरीचा फिरकीपटू मुशीर खानने बाद केले. जोरदार पावसामुळे सामना लवकर थांबवला गेला तेव्हा स्टँड-इन कर्णधार अंग्रीश रघुवंशी (नाबाद 15) आणि अमोघ भटकल (नाबाद 1) क्रीजवर होते.

परिणामी सुपर ओव्हरमध्ये, फाल्कन्सकडून आकाश पारकरने 27 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आर्क्स अंधेरीचा संघ डगमगला आणि फक्त 13 धावाच करू शकला, ज्यामुळे सोबो मुंबई फाल्कन्सचा विजय झाला.

देशभरातील सर्वोत्तम घरगुती टी-20 लीगपैकी एक मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव अभय हडप, एमसीएचे माजी अध्यक्ष डॉ. विजय पाटील, लीग गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष विहंग सरनाईक यांच्या उपस्थितीत डीवाय पाटील स्टेडियमवर झाले.

आकाश टायगर्स एमडब्ल्यूएस आणि मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला गेलेला दिवसाचा दुसरा सामनाही पावसामुळे प्रभावित झाला आणि तो नऊ षटकांचा झाला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल्सने रोहन राजेच्या 21 चेंडूत 48 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर 4 बाद 96 धावा केल्या. प्रत्युत्तरात, टायगर्सना 5 बाद 88 धावाच करता आल्या. मॅक्सवेल डेव्हिड स्वामिनाथनने गोलंदाजीत दमदार कामगिरी करत दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या आणि रॉयल्सचा आठ धावांनी विजय निश्चित केला.

संक्षिप्त धावफलक:

सामना 1 : सोबो मुंबई फाल्कन्स: 27 (आकाश पार्कर 27) सुपर ओव्हरमध्ये वि. वि. आर्क्स अंधेरी : 13 (शिवम दुबे १२, मुशीर खान १).

सामना २ : मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स: 96/4 (रोहन राजे 48 नाबाद) वि. वि. आकाश टायगर्स एमडब्ल्यूएस: 88/5 (जय बिस्ता 23; मॅक्सवेल स्वामिनाथन 2/15).

सामना 3 : ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट : 179/6 (जिगर राणा 53, सूर्यकुमार यादव 50 नाबाद) पराभूत वि. इगल ठाणे स्ट्रायकर्स : 181/5 (वरुण लवंडे 57, सियाराज पाटील 47 नाबाद)