(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC Champions Trophy 2025: ठरलं! चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानात; आयसीसीने दिली मंजुरी, टीम इंडियाचं काय?
ICC Champions Trophy 2025: पीसीबीने 2 आठवड्यांपूर्वी प्रस्तावित वेळापत्रक ICC ला पाठवले होते, ज्या अंतर्गत 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत सामने होणार आहेत.
ICC Champions Trophy 2025: पाकिस्तान पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे (ICC Champions Trophy 2025) यजमानपद भूषवणार आहे. 1996 च्या विश्वचषकानंतरची ही पहिली आयसीसी स्पर्धा असेल जी पाकिस्तानमध्ये खेळवली जाईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (पीसीबी) सुरक्षा व्यवस्थेबाबत वेळोवेळी टीका होत आहे, पण अखेर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या वेळापत्रकाला मंजुरी दिली आहे. पीसीबीने 2 आठवड्यांपूर्वी प्रस्तावित वेळापत्रक ICC ला पाठवले होते, ज्या अंतर्गत 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत सामने होणार आहेत.
आयसीसीने मान्यता दिली-
पाकिस्तानी मीडिया चॅनल जिओ टीव्हीचा हवाला देत, असे कळले आहे की आयसीसीने प्रस्तावित वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही आणि हे वेळापत्रक या महिन्याच्या अखेरीस इतर 7 देशांच्या बोर्डांसोबत शेअर केले जाईल. यजमान पाकिस्तान व्यतिरिक्त भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग असणार आहेत. प्रस्तावित वेळापत्रकानुसार भारताचे सर्व सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवले जातील. त्यानुसार 9 मार्चला भारत-पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. सामने आयोजित करण्यासाठी गद्दाफी स्टेडियम व्यतिरिक्त नॅशनल स्टेडियम (कराची) आणि रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम (रावळपिंडी) यांची निवड करण्यात आली आहे.
बीसीसीआयचे उत्तर येणे बाकी-
पीसीबीच्या प्रस्तावित वेळापत्रकाला आयसीसीने हिरवा झेंडा दिली असली तरी बीसीसीआय हा प्रस्ताव फेटाळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वर्षी आशिया चषक 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता, ज्याचे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु भारताने तेथे खेळण्यास नकार दिला होता. याच कारणामुळे भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. यावेळीही असेच काही घडण्याची अपेक्षा आहे. भारताचे सामने यूएईमध्ये, तर इतर संघांचे सामने पाकिस्तानमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत पाकिस्तानमध्ये गेला नाही तर...
बीसीसीआयने अनेकवेळा आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही, असे बीसीसीआयचे मत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात न गेल्यास ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली जाईल. ज्या अंतर्गत भारताचे सामने संयुक्त अरब अमिराती किंवा इतर कोणत्याही ठिकाणी खेळवले जातील.