Test Matches For Team India In 2025: नवीन वर्षात तगडे सामने होणार; 2025 मध्ये कोणत्या संघाविरुद्ध टीम इंडिया भिडणार, संपूर्ण वेळापत्रक!
Test Matches For Team India In 2025: 2025 मध्ये म्हणजेच नवीन वर्षात भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे.
Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team ) 2024 मध्ये कामगिरी संमिश्र प्रकाराची राहिली. भारतीय संघाने तब्बल 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले, पण न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने कसोटी मालिकेत भारतीय संघाचा 3-0 असा पराभव केला. किंबहुना भारतीय संघाला तब्बल 12 वर्षांनंतर आपल्याच भूमीवर कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडिया 2-1 ने पिछाडीवर आहे.
2025 मध्ये भारतीय संघ किती कसोटी सामने खेळणार आहे? (Test Matches For Team India In 2025)
2025 मध्ये म्हणजेच नवीन वर्षात भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही कसोटी 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवली जाणार आहे. जर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचला तर भारताला आणखी 1 कसोटी खेळण्याची संधी मिळेल. यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
इंग्लंड, वेस्ट इंडिजविरुद्ध रंगणार कसोटी मालिका-
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांमधील ही कसोटी मालिका भारतीय भूमीवर खेळवली जाणार आहे. यानंतर भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरुद्ध दुसरी मालिका खेळणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ या दौऱ्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. अशाप्रकारे, भारतीय संघ 2025 मध्ये एकूण 10 कसोटी सामने खेळणार आहे, परंतु जर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचली तर एकूण 11 सामने होतील.
टीम इंडिया फायनलमध्ये कधी आणि कशी पोहोचेल?
भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 चा शेवटचा सामना आता सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल, जो पुढील वर्षाचा पहिला सामना असेल. फायनलच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल, अन्यथा ती फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 184 धावांनी मोठा विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 3 जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे.