India Squad For Champions Trophy : शमी IN, सॅमसन OUT... चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंची जागा निश्चित?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यासाठी आता थोडाच वेळ राहिला आहे.
Team India Squad For Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यासाठी आता थोडाच वेळ राहिला आहे. यावेळी ही स्पर्धा 'हायब्रीड मॉडेल' अंतर्गत पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे होणार आहे. भारतीय संघ 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध (India vs Bangladesh) पहिला सामना खेळणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ घोषित करण्यासाठी 12 जानेवारी (रविवार) ही अंतिम मुदत दिली आहे. म्हणजेच या तारखेपर्यंत सर्व 8 देशांना आपापले संघ निवडायचे आहेत. भारतीय चाहतेही आपल्या संघाची निवड होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतीय निवडकर्ते निश्चितपणे संघाची निवड करतील, त्याआधी कोणते खेळाडू आहेत ज्यांना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते हे पाहू....
भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे असणार आहे. तर शुभमन गिल आणि माजी कर्णधार विराट कोहली यांची जागा जवळपास निश्चित आहे. यशस्वी जैस्वाल हा देखील निवडीची दावेदार आहे, पण एकदिवसीय क्रिकेटमधील शुभमनचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. अशा स्थितीत यशस्वीला संधी मिळणे कठीण दिसत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फॉर्म दाखवणाऱ्या श्रेयस अय्यरचेही संघात स्थान निश्चित दिसते.
त्याचबरोबर केएल राहुल आणि ऋषभ पंत यांना यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. राहुल-पंत संघात असल्यामुळे संजू सॅमसनचा पत्ता कट होऊ शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हार्दिक पांड्याची भूमिका महत्त्वाची असणार आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत बॉल आणि बॅटने दमदार कामगिरी दाखवणाऱ्या अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीलाही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांचा संघात समावेश केला जाऊ शकतो. पण जर कुलदीप तंदुरुस्त नसल्यास लेगस्पिनर रवी बिश्नोईला पण संधी मिळू शकते. वेगवान गोलंदाजी युनिटमध्ये चार गोलंदाजांचा समावेश केला जाऊ शकतो. सिडनी कसोटीत जखमी झालेला जसप्रीत बुमराह तंदुरुस्त होईल, अशी आशा आहे. मोहम्मद शमीही या मेगा टूर्नामेंटमध्ये खेळताना दिसणार आहे. याशिवाय अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज हे देखील टीम इंडियासोबत दुबईचे फ्लाइट पकडू शकतात.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संभाव्य 15 सदस्यीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव/रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.