विश्वचषकासाठी भारताची गोलंदाजी तयार, कुलदीप, सिराज-बुमराहने दाखवला दम
World Cup 2023 Team India : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा दारुण पराभव करत आठव्यांदा जेतेपद पटकावले.
World Cup 2023 Team India : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा दारुण पराभव करत आठव्यांदा जेतेपद पटकावले. विश्वचषकाच्या आधी भारतीय संघाने मिळवलेला विजय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. भारतीय संघाने सर्वच क्षेत्रात दर्जेदार खेळ केला. गोलंदाजीमध्ये सर्वांनीच आपले मोलाचे योगदान दिले. कुलदीप यादव, सिराज, बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार गोलंदाजी केली. विश्वचषकाआधी गोलंदाज फॉर्मात परतल्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. सिराजने फायनलध्ये अवघ्या २१ धावांत सहा विकेट घेतल्या. विश्वचषकात भारतीय संघ खतरनाक गोलंदाजी स्कॉडसह उतरणार आहे. मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शामी आणि हार्दिक पांड्या यांच्यासारखे दिग्गज गोलंदाज टीम इंडियाची ताकद वाढवतात.
यावेळी श्रीलंकेत झालेल्या आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत मोहम्मद सिराज संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 5 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. अंतिम सामन्यात त्याने 6 षटकात 21 धावा देत 6 बळी घेतले. सिराजने 1 मेडन ओव्हरही टाकली. हार्दिक पांड्याने 2.2 षटकात 3 धावा देत 3 बळी घेतले. बुमराहनेही एक विकेट घेतली. अंतिम सामन्यात भेदक गोलंदाजी करणाऱ्या सिराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तर संपुर्ण स्पर्धेत भेदक मारा करणाऱ्या कुलदीपला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूरही या स्पर्धेत टीम इंडियासाठी महत्त्वाचे ठरले. कुलदीपने 5 सामन्यात 9 विकेट घेतल्या. त्याची मालिका सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली. पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात कुलदीपने शानदार गोलंदाजी केली. त्याने 8 षटकात 25 धावा देत 5 बळी घेतले. शार्दुलने 4 षटकात 5 बळी घेतले. रविंद्र जाडेजाने 6 षटकांत 6 बळी घेतले.
यंदाचा विश्वचषक भारतामध्ये होत आहे. भारतीय खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळते. अशा स्थितीत भारतीय गोलंदाज फॉर्मात परतले आहेत. भारताकडे वेगवान गोलंदाजीसमोबत उत्कृष्ट फिरकी गोलंदाजही आहेत. टीम इंडियाच्या विजयात गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. टीम इंडियाने आशिया चषकात बहुतांश सामने आपल्या गोलंदाजांच्या जोरावर जिंकले. भारताने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. यानंतर बांगलादेशविरुद्ध ६ धावांनी विजय मिळवला. आणि फायनलमध्येही 10 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यातील विजयाचे श्रेय पूर्णपणे गोलंदाजांना जाते.