T20 World Cup 2024: रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्या फलंदाजीने विक्रम मोडण्यासाठी ओळखला जातो. हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अनेकदा चौकार आणि षटकार मारून काही विक्रम करतो किंवा मोडतो, पण यावेळी रोहितने टी-20 विश्वचषक 2024 मधील एक वेगळा विक्रम नोंदवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात रोहित शर्मा अप्रतिम फॉर्ममध्ये दिसला, ज्यामुळे त्याने प्रेक्षकांच्या बाबतीत नवा विक्रम केला.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला T20 विश्वचषकातील सर्वात जलद शतक झळकावता आले नाही, पण त्याच्या फलंदाजीदरम्यान प्रेक्षकांचा नवा विक्रम रचला गेला. खरंतर, जेव्हा रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत होता, तेव्हा 3.1 कोटी लोक हॉटस्टारवर लाइव्ह पाहत होते. हा आकडा या विश्वचषकातील दर्शकांच्या दृष्टीने आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. याआधी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत फलंदाजी करत होता तेव्हा जवळपास 2.8 कोटी लोक बघत होते.






ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माची तुफान फटकेबाजी-


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात रोहित शर्माने आपल्या धमाकेदार फलंदाजीने शो चा धुमाकूळ घातला होता. भारतीय कर्णधाराने 41 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 92 धावा केल्या होत्या. यावेळी रोहितचे शतक हुकले होते. रोहित शर्मासमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी शरणगती पत्कारली होती. 


टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवून सेमी फायनल गाठली-


टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवून या विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडियाने सुपर-8 मध्ये सलग तिसरा विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियापूर्वी भारताने सुपर-8 मध्ये अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा पराभव केला होता. यापूर्वी भारताने ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकले होते. टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठताना एकही सामना गमावलेला नाही. आता भारताचा उपांत्य सामना 27 जूनला इंग्लंडविरुद्ध होणार आहे.


भारत-इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट-


भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा उपांत्य सामना 27 जून रोजी वेस्ट इंडिजच्या वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता होणार आहे. जर आपण हवामानाचा अंदाज पाहिल्यास, पुढील आठवडाभर गयानामध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. भारत-इंग्लंड सामना गुरुवारी होणार असून या दिवशीही गयानामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या एजन्सीच्या म्हणण्यानुसार, गयाना जून महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. या भागात महिन्यातील 30 पैकी सरासरी 23 दिवस पाऊस सतत सुरू असतो. या वृत्तामुळे दुसरा उपांत्य फेरीचा सामनाही पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024 Semi Final: 'भारत, इंग्लंड नव्हे...हा संघ टी20 विश्वचषक जिंकणार'; दिग्गजाच्या भविष्यवाणीने सर्व आर्श्चयचकीत


T20 World Cup 2024: IND vs ENG: भारत-इंग्लंडचा सामना खेळवल्या जाणाऱ्या गयानामध्ये महिन्याचे 23 दिवस कोसळतो पाऊस; सेमी फायनल रद्द होणार?