David Warner Retirement: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर याने (David Warner) काल म्हणजेच 25 जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र, तो आयपीएलसह इतर लीगमध्ये खेळत राहणार आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नावावर 49 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाच्या संघात सलामीवीर म्हणून कोणाला संधी देणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र याचदरम्यान सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन डेव्हिड वॉर्नरने संकेत दिले आहे. 


टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेतून ऑस्ट्रेलियाचा संघ बाहेर पडला आहे. यानंतर डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्कसोबत पार्टी करताना दिसला. जेक फ्रेझर मॅकगर्क देखील ऑस्ट्रेलियाच्या संघातसोबत राखीव खेळाडू म्हणून सामील होता. डेव्हिड वॉर्नरने हा फोटो शेअर करत, 'All yours now champion' असं म्हटलं आहे. यावरुन डेव्हिड वॉर्नरने सलामीसाठी जेक फ्रेझर मॅकगर्कला संधी दिली जाणार असल्याचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.


जेक फ्रेझर मॅकगर्क कोण आहे? (Who is Jake Fraser-McGurk?)


जेक फ्रेझर हा एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आहे, ज्याचा जन्म 11 एप्रिल 2002 रोजी मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे झाला. मॅकगर्कने कॅरी बॅप्टिस्ट ग्रामर स्कूलमध्ये शिक्षण घेतले. तो त्याच्या आक्रमक आणि तुफानी खेळीसाठी ओळखला जातो. मॅकगर्कने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 16 सामने खेळताना 550 धावा केल्या आहेत. त्याच्या लिस्ट-1 कारकिर्दीत त्याने 21 सामन्यांत 525 धावा केल्या आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या या तुफानी फलंदाजाने 41 टी-20 सामने खेळून 808 धावा केल्या आहेत. त्याने फेब्रुवारी 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन संघासाठी पदार्पण केले, जिथे तो वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामना खेळताना दिसला. आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून खेळलेल्या 2 वनडे सामन्यांमध्ये त्याने 221.73 च्या स्ट्राईक रेटने 51 धावा केल्या आहेत.


मॅकगर्कने 29 चेंडूत शतक झळकावले आहे-


जेक फ्रेझर मॅकगर्कने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन देशांतर्गत क्रिकेटमध्ये 29 चेंडूत शतक झळकावले आहे. यासह तो क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला. त्याच्या आधी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता, ज्याने आयपीएलमध्ये 30 चेंडूत शतक झळकावले होते. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एबी डिव्हिलियर्सने 31 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या होत्या. या दोन्ही दिग्गज फलंदाजांनी मॅकगर्कला मागे सोडले आहे, ज्याने 2023 मध्ये झालेल्या मार्श कप स्पर्धेत दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना तस्मानियाविरुद्ध केवळ 29 चेंडूत 100 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात त्याने 38 चेंडूत 125 धावा केल्या होत्या.


डेव्हिड वॉर्नरची कारकीर्द-


डेव्हिड वॉर्नरने 112 कसोटी सामन्यांचं प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये 8786 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 3 वेळी कसोटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावले आहे. तर 36 शतक आणि 37 अर्धशतक डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये 97.26 च्या स्ट्राईट रेटने त्याने 6932 धावा केल्या आहेत. वनडेत डेव्हिड वॉर्नरने 22 शतक आणि 33 वेळा अर्धशतक झळकावले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये 139.77 च्या स्ट्राईक रेटने डेव्हिड वॉर्नरने फलंदाजी केली. यामध्ये 1 शतक आणि 28 अर्धशतक डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. 


संबंधित बातमी:


IPL 2024 Jake Fraser-McGurk: माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक फ्रेझर-मॅकगर्क?