T20 World Cup 2024: IND vs ENG: T20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीचे सामने निश्चित झाले आहेत. पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान आमनेसामने असतील. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतासमोर गतविजेत्या इंग्लंडचे आव्हान आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सामना वेस्ट इंडिजमधील गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर होणार आहे. इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशनने (ICC) दुसऱ्या सेमीफायनलसाठी कोणताही राखीव दिवस ठेवला नसल्याचा हा विषय चर्चेला आला आहे. तसेच भारत आणि इंग्लंडच्या सामन्यावर पावसाचे सावट असण्याची शक्यता आहे.
भारत-इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट-
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा उपांत्य सामना 27 जून रोजी वेस्ट इंडिजच्या वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता आणि भारतीय वेळेनूसार रात्री 8 वाजता होणार आहे. जर आपण हवामानाचा अंदाज पाहिल्यास, पुढील आठवडाभर गयानामध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. भारत-इंग्लंड सामना गुरुवारी होणार असून या दिवशीही गयानामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या एजन्सीच्या म्हणण्यानुसार, गयाना जून महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. या भागात महिन्यातील 30 पैकी सरासरी 23 दिवस पाऊस सतत सुरू असतो. या वृत्तामुळे दुसरा उपांत्य फेरीचा सामनाही पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे.
27 जून रोजी हवामान कसे असेल?
27 जून रोजी वेस्ट इंडिजच्या गयानामध्ये 75 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामना सुरू असताना हवामान चांगले राहण्याची अपेक्षा असली तरी सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस झाल्यास मैदान ओले असल्याने खेळ सुरू होण्यास उशीर होऊ शकतो. गयानामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पावसाची 35-68 टक्के शक्यता आहे.
सामना रद्द झाला तर?
स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, आयसीसीने जाहीर केले होते की त्याच दिवशी दुसरा उपांत्य सामना आयोजित करण्यासाठी सर्व शक्य प्रयत्न केले जातील आणि या प्रयत्नात दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ जोडण्यात आला. हा सामना काही कारणास्तव रद्द झाला तरी भारत अंतिम फेरीत प्रवेश करेल. एकही सामना न खेळता आणि विजयाची नोंद न करताही, टीम इंडियाला अंतिम फेरीत स्थान दिले जाईल कारण त्यांनी सुपर-8 मध्ये इंग्लंडपेक्षा जास्त गुण मिळवले होते. त्यामुळे भारताला आता याचा फायदा होणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.