भारतानं वाचवूनही पाकिस्तान डेंजर झोनमध्ये, अमेरिका आयरलँड विरुद्ध एक बॉल न खेळता सुपर 8 मध्ये जाण्याची शक्यता कारण...
T20 WORLD CUP 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं काल अमेरिकेला पराभूत केल्यानं पाकिस्तानच्या सुपर 8 च्या आशा जिवंत राहिल्या आहेत. मात्र, फ्लोरिडातील एका गोष्टीमुळं बाबर आझमचं टेन्शन वाढलंय.
न्यूयॉर्क : टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 WORLD CUP 2024) अ गटात भारत, पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयरलँडचा समावेश आहे. भारतानं तीन मॅच जिंकत सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारतानं 7 विकेटनं अमेरिकेला (IND vs USA) पराभूत केल्यानं पाकिस्तानच्या (Pakistan) सुपर 8 च्या आशा जिंवत आहेत. अ गटातून भारत सुपर 8 मध्ये पोहोचला आहे. आता अमेरिका आणि पाकिस्तान सुपर 8 च्या शर्यतीत आहेत. मात्र, पाकिस्तानचा संघ सुपर 8 ला मुकण्याची शक्यता निर्माण झालीय.फ्लोरिडात सुरु असलेल्या पूरस्थितीमुळं आणि पावसानं अमेरिका विरुद्ध आयरलँड मॅच रद्द झाल्यास पाकिस्तान स्पर्धेबाहेर फेकला जाऊ शकतो.
अमेरिका आणि आयरलँड यांच्यामध्ये फ्लोरिडात 14 जूनला मॅच होणार आहे. पूरस्थिती आणि पावसामुळं मॅच रद्द करावी लागल्यास बाबर आझमला आणि पाकच्या टीमला मोठा धक्का बसू शकतो. पाकिस्ताननं तीन मॅच पैकी केवळ एका मॅचमध्ये विजय मिळवला आहे. पाकिस्तानच्या नावावर 2 गुण आहेत. आयरलँडला पराभूत करत ते आणखी दोन गुण मिळवू शकतात. मात्र ही मॅच 16 जूनला आहे. अमेरिका आणि आयरलँड ही मॅच 14 जूनला होणार आहे. या मॅचच्या निकालावर पाकिस्तानचं भविष्य अवलंबून असेल. अमेरिकेच्या नावावर चार गुण आहेत. अमेरिकेला आयरलँडनं पराभूत केल्यास पाकिस्तानसाठी सुपर 8 ची संधी नेट रनरेटच्या जोरावर मिळू शकते.
अमेरिका विरुद्ध आयरलँड मॅच रद्द झाल्यास पाकिस्तान स्पर्धेबाहेर
अमेरिका आणि आयरलँड यांच्यातील मॅचमध्ये पावसानं व्यत्यय आणल्यास बाबरच्या संघाला स्पर्धेबाहेर जावं लागेल. अमेरिका आणि आयरलँड यांच्यातील मॅचमध्ये जर पावसानं व्यत्यय आणला तर दोन्ही संघांना एक एक गुण मिळेल. याचा थेट फटका पाकिस्तानला बसेल आणि ते स्पर्धेबाहेर जातील.
पाकिस्तान आणि आयरलँड यांच्यातील मॅच 16 जूनला होणार आहे. आयरलँड आणि अमेरिका मॅच रद्द झाली तरी पाकिस्तान स्पर्धेबाहेर जाईल. याशिवाय अमेरिकेनं विजय मिळवला तरी पाक बाहेर जाणार आहे. उद्या होणाऱ्या मॅचमध्ये आयरलँडनं विजय मिळवल्यास पाकिस्तानसाठी सुपर 8 च्या आशा कायम राहतील.
पाकिस्ताननं आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये तीन मॅच खेळल्या आहेत. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. भारताविरुद्ध पाकिस्तानला 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अखेर कॅनडाला पराभूत करत पाकिस्ताननं पहिला विजय मिळवला. मात्र, पाकिस्तानच्या सुपर 8 च्या प्रवेशाचा निर्णय अमेरिका आणि आयरलँड यांच्यातील मॅचच्या निकालावर अवलंबून असेल. अमेरिकेनं आयरलँड विरुद्ध मॅच जिंकल्यास ते सुपर 8 मध्ये जाऊ शकतात.
संबंधित बातम्या :