(Source: Poll of Polls)
IND vs NZ 3rd T20I: निर्णायक सामन्यात सूर्यकुमार यादव करु शकतो हा खास रेकॉर्ड, दिग्गज फलंदाजांना मागे टाकण्याची संधी
Suryakumar Yadav : भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव अहमदाबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणार्या शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एका खास विक्रमाला गवसणी घालू शकतो.
India vs New Zealand T20 : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना 1 फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असेल. कारण आतापर्यंत दोन्ही संघ 1-1 सामने जिंकून मालिकेत बरोबरीवर आहेत. अशा स्थितीत शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो असा असेल. दोन्ही संघांव्यतिरिक्त हा सामना भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी खूप खास असेल. या सामन्यात मोठी खेळी करून सूर्या अनेक बड्या फलंदाजांना मागे टाकू शकतो.
कोहली-मॅक्युलमसह अनेक फलंदाजांना टाकू शकतो मागे
सूर्याने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध एकूण 7 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 52 च्या सरासरीने आणि 151.16 च्या स्ट्राइक रेटने 260 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सूर्या 10 व्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात सूर्या मोठी खेळी खेळून रॉस टेलर, केएल राहुल, टिम सेफर्ट, विराट कोहली आणि ब्रेंडन मॅक्युलम यांचे विक्रम मोडू शकतो. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ब्रेंडन मॅक्कुलम 261 धावांसह 9व्या, विराट कोहली 311 धावांसह 8 व्या, टीम सेफर्ट 322 धावांसह सातव्या, केएल राहुल 322 धावांसह सहाव्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर रॉस टेलर 349 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. पुढील सामन्यात शतक झळकावून सूर्या सर्व फलंदाजांचा विक्रम मोडू शकतो.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
- रोहित शर्मा - 511 धावा.
- कॉलिन मुनरो - 426 धावा.
- केन विल्यमसन - 419 धावा.
- मार्टिन गप्टिल - 380 धावा.
- रॉस टेलर - 349 धावा.
- केएल राहुल - 322 धावा.
- टिम सेफर्ट - 322 धावा.
- विराट कोहली - 311 धावा.
- ब्रेंडन मॅक्युलम - 261 धावा.
- सूर्यकुमार यादव - 260 धावा.
भारताच्या अंतिम 11 मध्ये बदल होणार?
भारताने न्यूझीलंडविरुद्ध सुरुवातीच्या दोन्ही टी20 सामन्यात शॉ ऐवजी एकदिवसीय सामन्यांमध्ये सतत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला पसंती दिली होती. मात्र, गिल या फॉरमॅटमध्ये चमत्कार करू शकलेला नाही. या मालिकेतील दोन सामन्यांमध्ये गिलने केवळ 9 च्या सरासरीने 18 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, ईशान किशनची बॅटही शांत झाली आहे. किशनने या मालिकेत आतापर्यंत 11.50 च्या सरासरीने 23 धावा केल्या आहेत. तसंच या मालिकेसाठी पहिल्यांदाच यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माचा टीम इंडियात समावेश करण्यात आला. अशा स्थितीत निर्णायक सामन्यात हार्दिक जितेशला अंतिम 11 मध्ये स्थान देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय उमरान मलिक नरेंद्र मोदी स्टेडियमवर संघात परतणार की नाही, हेही पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या निर्णायक सामन्यात कॅप्टन हार्दिक कोणा-कोणाला संधी देतो हे पाहावं लागेल.
संभाव्य भारतीय संघ- हार्दिक पांड्या (कर्णधार), पृथ्वी शॉ, ईशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग
हे देखील वाचा-