Champions Trophy Points Table : धावांच्या डोंगराखाली गुदमरला अफगाणिस्तान! 'चोकर्स' समजली जाणारी दक्षिण आफ्रिका पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर
ICC Champions Trophy : न्यूझीलंड आणि भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या प्रवासाची सुरूवात धमाकेदारपणे केली आहे.

South Africa VS Afghanistan Champions Trophy : न्यूझीलंड आणि भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या प्रवासाची सुरूवात धमाकेदारपणे केली आहे. कराची येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव केला. 107 धावांनी मोठा विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल टाकले. ब गटाच्या पॉइंट टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर गेला आहे.
रायन रिकेल्टनच्या संस्मरणीय पहिल्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 315 धावांचा मोठा आकडा उभारला. त्यानंतर कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांच्यासह वेगवान गोलंदाजांनी अफगाणिस्तानला 208 धावांत गुंडाळले.
An emphatic win helped kick off South Africa's #ChampionsTrophy campaign in style 🤩
— ICC (@ICC) February 21, 2025
Match Highlights 🎥#AFGvSAhttps://t.co/P2aKGO8fwh
21 फेब्रुवारी शुक्रवारी या स्पर्धेत ग्रुप बी चा हा पहिला सामना होता. तसेच, पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या अफगाणिस्तान संघाचे ही या स्पर्धेत पदार्पण सामना झाले. दोन्ही संघांच्या अलीकडील इतिहासाचा विचार करता, हा सामना खूप रोमांचक होण्याची अपेक्षा होती. काही महिन्यांपूर्वीच अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला एकदिवसीय मालिकेत हरवले होते. त्याआधी, टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोघांमध्ये खूप चुरशीचा सामना झाला होता, जो दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता. पण यावेळी दोघांमधील सामना एकतर्फी झाला.
रायन रिकेल्टनचे तुफानी शतक
अफगाणिस्तानने चांगली सुरुवात केली आणि दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर टोनी डी झोर्झीला लवकर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. परंतु रायन रिकेल्टनने कर्णधार बावुमा (58) सोबत डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी 127 धावांची भागीदारी केली, ज्यामध्ये प्रथम रिकेल्टन आणि नंतर बावुमा यांनी आपापले अर्धशतक पूर्ण केले. लवकरच रिकेल्टनने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतकही पूर्ण केले. तो 103 धावा करून आऊट झाला. पण दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी त्यांची तुफनी फटकेबाजी सुरूच ठेवली. रॅसी व्हॅन डर ड्यूसेन (52) याने वेगवान अर्धशतक झळकावले तर एडेन मार्करामने अवघ्या 36 चेंडूत नाबाद 52 धावा करत संघाला सन्मानजनक 315 धावांपर्यंत पोहोचवले.
फलंदाजांनंतर, दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी कहर केला, ज्यांनी पॉवरप्लेमध्येच अफगाणिस्तानला बॅकफूटवर आणले. लुंगी एनगिडीने चौथ्या षटकात रहमानुल्लाह गुरबाजला माघारी पाठवले आणि रबाडाने दहाव्या षटकात इब्राहिम झद्रानला आऊट केले. पुढच्या 5 षटकांत अफगाणिस्तानने कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी आणि सेदिकुल्लाह अटल यांची विकेट गमावली आणि धावसंख्या फक्त 50 धावांपर्यंत पोहोचली. यानंतर, विकेट पडत राहिल्या पण रेहमत शाहने दुसऱ्या टोकावरून एकटा उभा राहिला. त्याने एकट्याने 90 धावा केल्या पण संपूर्ण संघ 208 धावांवर ऑलआउट झाला. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
हे ही वाचा -

















