हिंजवडीत कामासाठी जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; वाहतूक कोंडी कमी होणार? पुन्हा मेट्रोझिप बससेवा सुरू करण्याचा निर्णय
कोविड महामारी आणि ‘वर्क फ्रॉम होम’च्या संकल्पनेमुळे 2020 नंतर ही सेवा बंद करण्यात आली होती.

Pune news: हिंजवडीतील आयटी पार्क परिसरात पुन्हा एकदा ‘मेट्रोझिप’ ही खासगी बससेवा सुरू होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत असताना हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन (HIA) ने पुढाकार घेत हा निर्णय घेतलाय. कामाच्या वेळात लाखोंच्या संख्येने कर्मचारी हिंजवडीमध्ये ये-जा करतात. त्यामुळे रोजच्याच वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘मेट्रोझिप’ बससेवा मोठा दिलासा ठरू शकते.
नेमकं काय होणार?
ही सेवा पहिल्यांदा 2014 साली सुरू करण्यात आली होती. आयटी अभियंते आणि कर्मचाऱ्यांसाठीच ही खासगी वाहतूक सेवा होती. अनेक कंपन्यांनी यामध्ये सहभाग नोंदवत आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मेट्रोझिप सेवा सुरू केली होती. मात्र कोविड महामारी आणि ‘वर्क फ्रॉम होम’च्या संकल्पनेमुळे 2020 नंतर ही सेवा बंद करण्यात आली होती.
आता पुन्हा एकदा आयटी कर्मचारी मोठ्या प्रमाणात ऑफिसमध्ये उपस्थित राहू लागले आहेत. त्याचवेळी वाहतूक कोंडीचाही प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी पिक अवर्समध्ये पुणे-हिंजवडी फेज 1 ते फेज 3 मार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. त्यावर उपाय म्हणून एचआयएने पुन्हा एकदा मेट्रोझिप सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव MIDC आणि RTO कडे सादर केला आहे. लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असून, मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच सेवा सुरू करण्यात येणार आहे.
‘मेट्रोझिप’ सेवा कशी असेल?
* HIA कडे नोंदणीकृत असलेल्या 200 हून अधिक कंपन्यांमधील कर्मचारी व अभियंते या सेवेचा लाभ घेऊ शकतील.
* एकूण 150 ते 200 खासगी बसगाड्या रस्त्यावर धावतील.
* पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील जवळपास सर्व भागांतून हिंजवडीकडे या बसगाड्या सुटतील.
* खासगी गाड्यांचा वापर कमी करणे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
ही सेवा पुन्हा सुरू झाल्यास हजारो कर्मचारी आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, वाढलेला प्रवासाचा खर्च आणि वेळ यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘मेट्रोझिप’ सेवा फायदेशीर ठरणार आहे. यामुळे पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होईल, असं HIAचे म्हणणं आहे.
शहरातील वाढती वाहनसंख्या, प्रदूषण आणि वेळेचा अपव्यय यावर तोडगा म्हणून ‘मेट्रोझिप’ सेवा पुन्हा सुरू होणं ही गरज बनली आहे. हिंजवडीतील हा उपक्रम इतर औद्योगिक भागांसाठीही फायद्याचा ठरू शकतो.

























