Shubman Gill : शुभमन गिलनं इंग्लंडमध्ये इतिहास रचला, 93 वर्षात दुसऱ्यांदाच अशी कामगिरी, आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर
IND vs ENG 2nd Test: बर्मिघम कसोटीमध्ये इंग्लंडनं पहिल्यांदा भारताला फलंदाजीला आमंत्रित केलं होतं. शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा या दोघांच्या 203 धावांच्या भागीदारीनं इंग्लंडचे मनसुबे धुळीस मिळाले.

Shubman Gill 150: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र भारतानं गाजवलं. पहिल्या दिवशी भारतानं 211 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. यानंतर शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा या दोघांनी 203 धावांची भागीदारी केली. शुभमन गिल सध्या 168 धावांवर नाबाद आहे. तर, रवींद्र जडेजा 89 धावा करुन बाद झाला आहे. शुभमन गिलनं 150 धावा करत एक इतिहास रचला आहे. इंग्लंडमध्ये त्यांच्या विरुद्ध 150 धावा करणारा गिल दुसरा कर्णधार ठरला आहे. या शानदार कामगिरीच्या जोरावर शुभमन गिलनं जेम्स अँडरसन- सचिन तेंडुलकर ट्रॉफीत 300 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. भारत इंग्लंड कसोटी मालिकेचं नाव पटौदी ट्रॉफी ऐवजी अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी करण्यात आलं होतं.
इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये 150 पेक्षा जास्त धावांची खेळी करणारा गिल दुसरा कॅप्टन ठरला आहे. मोहम्मद अजहरुद्दीन यानं यापूर्वी इंग्लंडमध्ये 150 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. त्यानं ही खेळी 1990 मध्ये केली होती. भारतानं पहिली कसोटी 1932 मध्ये खेळली होती. गेल्या 93 वर्षात केवळ दोन खेळाडूंनी कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये इंग्लंड विरुद्ध 150 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. शुभमन गिल कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध 1000 धावा करण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. गिलनं इंग्लंड विरुद्ध 21 डावांमध्ये 900 धावांहून अधिक धावा केल्या आहेत.
शुभमन गिल एका विक्रमापासून 11 धावा दूर
मोहम्मद अजहरुद्दीननं इंग्लंडमध्ये इंग्लडविरुद्ध दमदार कामगिरी केली आहे. अजहरुद्दीन यानं 1990 मध्ये इंग्लंडविरुद्ध 179 धावा केल्या होत्या. शुभमन गिल सध्या बर्मिंघम कसोटीत नाबाद आहे. इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा कॅप्टन म्हणून तो दुसऱ्या स्थानावर आहे. गिलकडे 11 धावा केल्यास अजहरुद्दीनचा विक्रम मोडण्याची संधी आहे. 2018 मध्ये विराट कोहलीनं 149 धावांची खेळी केली. मन्सूर अली खान पटौदी यांनी 1967 मध्ये 148 धावा केल्या होत्या.
दरम्यान, रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघाचं नेतृत्त्व शुभमन गिलकडे देण्यात आलं आहे. शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतीय फलंदाजांनी दोन कसोटीतील तीन डावात 350 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून भारतीय संघाचा बरोबरी करण्याचा प्रयत्न असेल. भारतानं दुसऱ्या कसोटीत तीन फेरबदल केले आहेत. वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप आणि नितीशकुमार रेड्डीला संघात स्थान देण्यात आलं आहे. दुसऱ्या कसोटीत भारताची लोअर मिडल ऑर्डर कशी फलंदाजी करते ते पाहावं लागेल.



















