रोहित शर्मा 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय, गांगुली-विराटचा विक्रम मोडला
Rohit Sharma Record : नेदरलँड्सच्या रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
Rohit Sharma Record : नेदरलँड्सच्या रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. यंदाच्या वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरलाय. त्याशिवाय इतर विक्रमही त्याने नावावर केलेत. रोहित शर्माने विराट कोहली आणि सौरव गांगुली या माजी कर्णधारांचा विक्रम मोडीत काढलाय. रोहित शर्माने विश्वचषकात 500 धावांचा टप्पा पार केला आहे. भारताच्या क्रिकेट इतिहासात रोहित शर्माने सोनेरी अध्याय लिहिलाय. विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार म्हणून रोहित शर्मा याने इतिहास लिहिलाय.
अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिलाच कर्णधार -
वनडे वर्ल्ड कपमध्ये कर्णधार असताना एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम याआधी सौरव गांगुलीच्या नावावर होता. 2003 च्या विश्वचषकात सौरव गांगुलीने तीन शतकांच्या मदतीने 465 धावा चोपल्या होत्या. 2003 च्या विश्वचषकात भारतीय संघाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. 2019 च्या विश्वचषकात विराट कोहलीने पाच अर्धशतकाच्या मदतीने 443 धावा केल्या होत्या. सौरव गांगुली आणि विराट कोहली यांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही कर्णधाराला आतापर्यंत विश्वचषकात 400 धावांचा टप्पा पार करता आला नव्हात. रोहित शर्माने हा विक्रम मोडला आहे. रोहित शर्माने यंदाच्या विश्वचषकात 500 धावांचा टप्पा पार केला आहे. विश्वचषकात 500 धावा कर्णधारा रोहित शर्मा पहिला भारतीय कर्णधार ठरलाय.
Rohit Sharma today:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 12, 2023
First Indian captain to score 500 runs in a World Cup edition.
2nd player after Sachin to score 500+ runs in an edition twice.
- The GOAT of the World Cups. pic.twitter.com/Hx60J9l47o
एका वर्षात सर्वाधिक षटकार -
डिव्हिलियर्सने 2015 मध्ये एकदिवसीय सामन्यात एका कॅलेंडर वर्षात 58 षटकार मारले होते. हा विक्रम गेल्या 7 वर्षांपासून अबादीत होता. आता रोहित शर्माने हा विक्रम मोडलाय. नेदरलँड्सविरुद्ध रोहित शर्माने आपल्या डावातील पहिला षटकार ठोकताच डिव्हिलियर्सचा विक्रम मोडलाय.
विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणारा कर्णधार
रोहितने आणखी एक खास विक्रमही नावावर केला. कर्णधार म्हणून तो विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडूही ठरला. त्याच्या आधी हा विक्रम इऑन मॉर्गनच्या नावावर होता. मॉर्गनने 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत 22 षटकार मारले होते.
भारताची दमदार सुरुवात
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी खेळी केली. या तिघांच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने 29 षटकात 200 धावांचा पल्ला पार केला. सध्या श्रेयस अय्यर आणि केएल राहुल मैदानावर आहेत.