IND vs NZ: कॅप्टन रोहितची कमाल, सनथ जयसूर्याचा खास रेकॉर्ड मोडला
Rohit Sharma : रोहित शर्मा वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. याबाबतीत त्याने श्रीलंकेचा माजी क्रिकेटर सनथ जयसूर्याला मागे टाकलं आहे.
India vs New Zealand : भारतीय क्रिकेट संघाचा (India) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणखी एक अप्रतिम रेकॉर्ड नावावर केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. यादरम्यान त्याने श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्याचा विक्रम मोडला. सामन्यापूर्वी रोहितला जयसूर्याचा विक्रम मोडण्यासाठी चार षटकारांची गरज होती. डावाची सुरुवात करण्यासाठी आल्याआल्याच हिटमॅनने जयसूर्याला मागे टाकले. जयसूर्याने एकदिवसीय कारकिर्दीत 270 षटकार ठोकले होते. त्याच वेळी, रोहितने आता वनडे क्रिकेटमध्ये 273 षटकार ठोकले आहेत. इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात रोहितने शतक ठोकलं असून बऱ्याच काळानंतर त्याने सेन्चूरी ठोकली आहे. रोहित 85 चेंडूत 101 धावा केल्या. यावेळी त्याने 6 षटकार आणि 9 चौकार ठोकले.
सर्वाधिक षटकारांचा खास रेकॉर्ड
वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदीने 398 एकदिवसीय सामन्यांच्या 369 डावांमध्ये फलंदाजी करताना सर्वाधिक 351 षटकार मारले होते. शाहिद आफ्रिदी जवळपास 19 वर्षे पाकिस्तानकडून खेळला. वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. युनिव्हर्सल बॉसने 301 एकदिवसीय सामन्यांच्या 294 डावांमध्ये 331 षटकार मारले. तर श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्याने 445 एकदिवसीय सामन्यांच्या 433 डावांमध्ये 270 षटकार ठोकले आहेत.
भारत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने
इंदूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारतानं दमदार सुरुवात केली आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल दोघेही शतक ठोकून बाद झाले असले तरी भारताने तोवर मोठी धावसंख्या उभारली आहे. विराट कोहलीही चांगल्या फॉर्मात दिसत आहे. बातमी लिहिपर्यंत भारताने 31 षटकात 2 विकेट गमावत 247 धावा केल्या होत्या.
न्यूझीलंडने निवडली गोलंदाजी
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs NZ ODI Series) तगडा विजय मिळवत मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ज्यानंतर भारत आजचा सामना जिंकून न्यूझीलंडला व्हाईट वॉश देऊ शकतो. तर न्यूझीलंड अखेरचा सामना जिंकून किमान मालिकेचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यात मागील काही सामने भारत प्रथम फलंदाजी करुन मोठी धावसंख्या उभारताना दिसला. आजही भारत अशीच कामगिरी करणार की ज्याप्रमाणे दुसऱ्या वन-डेमध्ये न्यूझीलंड (India vs New Zealand) स्वस्तात सर्वबाद झाला तशीच वेळ भारतावर येणार हे पाहावे लागेल. दरम्यान भारताने दोन बदल केले असून सिराज आणि शमी यांना विश्रांती देत चहल आणि उमरानला संधी दिली आहे. न्यूझीलंडनेही जॅकॉब डफीला हेन्री शिपलेच्या जागी संधी दिली आहे.
हे देखील वाचा-