Rishabh Pant Punished : एकाच कसोटीत दोन शतके, अनेक विक्रम मोडले; तरी ऋषभ पंतवर आयसीसीने केली कारवाई, जाणून घ्या प्रकरण
IND vs ENG Test News : लीड्स कसोटी ऋषभ पंतसाठी कायमची संस्मरणीय ठरली आहे. त्याने कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावले.

Rishabh Pant Punished : लीड्स कसोटी ऋषभ पंतसाठी कायमची संस्मरणीय ठरली आहे. त्याने कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावले. अशी कामगिरी करणारा तो जगातील फक्त दुसरा यष्टिरक्षक फलंदाज आहे. परदेशी भूमीवर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच यष्टिरक्षक फलंदाज आहे. पण, खेळाचे फक्त चार दिवस पूर्ण झाले आहेत, एक दिवस शिल्लक आहे आणि या शेवटच्या दिवशी कोणता संघ सामना जिंकेल हे ठरवले जाईल. दरम्यान, ऋषभ पंतला फटकारण्यात आले आहे. खरंतर, पंतने आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केले होते, ज्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणे पंतला पडले महागात....
हेडिंग्ले कसोटीच्या तिसऱ्या दिवशी हॅरी ब्रूक फलंदाजी करत असताना, भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत चेंडू घेऊन पंचांकडे गेला आणि त्याला काहीतरी बोलू लागला. यादरम्यान, दोघांमध्ये काही वाद झाला, ज्यामुळे पंतने रागाने चेंडू सिराजकडे फेकला. ऋषभ पंतने नाराजी व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे, परंतु आयसीसीने तो गांभीर्याने घेतला आहे.
आयसीसीने पंतला फटकारले...
ऋषभ पंत आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन करत दोषी आढळला आहे. त्यामुळे त्याला फटकारण्यात आले आहे आणि आयसीसीने त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट जोडला आहे. पण, सध्या तरी याचा कोणताही परिणाम होणार नाही. पंतने लेव्हल 1 चे उल्लंघन केले आहे. असे म्हटले जाते की पंतने त्याचा गुन्हा मान्य केला आहे, त्यामुळे त्याबद्दल पुढे काहीही बोलले जाणार नाही.
India centurion reprimanded for actions during Day 3 of the first #ENGvIND Test.https://t.co/Cd90zQDA9f
— ICC (@ICC) June 24, 2025
डिमेरिट पॉइंटचा काय परिणाम होतो?
पंतला डिमेरिट पॉइंट दिल्याने सध्या कोणताही परिणाम होणार नाही. परंतु तुम्हाला त्याचे नियम माहित असले पाहिजेत. जर एखाद्या खेळाडूला 24 महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच दोन वर्षांच्या कालावधीत चार किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉइंट मिळाले तर त्याला काही सामने खेळण्यास बंदी घातली जाते. पण, पंतला पहिल्यांदाच हा डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
पंतने दोन्ही डावात ठोकले शतक
ऋषभ पंतने सामन्याच्या पहिल्या डावात 178 चेंडूत 134 धावा केल्या. त्यात 12 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर, दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा पंतने 140 चेंडूत 118 धावा केल्या. यावेळी पंतने 15 चौकार आणि तीन षटकार मारले. आता पंत भारताच्या त्या निवडक खेळाडूंपैकी एक बनला आहे ज्यांनी कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावले आहे.





















