मोठी बातमी : भारताच्या वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती
Piyush Chawla Retirement Form Cricket : भारताचा फिरकीपटू पियुष चावला याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Piyush Chawla Retirement Form Cricket : भारतीय क्रिकेटपटू पियूष चावला (Piyush Chawla) याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो गेल्या वर्षी मुंबई इंडियन्स संघासाठी खेळला होता. आयपीएल 2025 च्या लिलावातही त्याने आपले नाव नोंदवले होते, मात्र कोणत्याही संघाने त्याला विकत घेतले नव्हते. दरम्यान, आता आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर पियुष चावलाने (Piyush Chawla) निवृत्ती जाहीर करत एक भावनिक पोस्ट शेअर केली.
View this post on Instagram
पियूष चावलाने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण शेअर करत एक नोट लिहिली. त्याने पोस्ट शेअर करत असताना कॅप्शनमध्ये लिहिले – "या अध्यायाचा शेवट करत आहे! क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होत आहे. या सुंदर प्रवासात पाठिंबा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार."
पियूष चावलाची निवृत्ती नोट :
"मैदानावर दोन दशकांपेक्षा अधिक काळ घालवल्यानंतर, आता या सुंदर खेळाला अलविदा म्हणण्याची वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करणं, 2007 चा टी20 विश्वचषक आणि 2011 च्या वनडे विश्वचषक विजयी संघाचा भाग असणं – या अविश्वसनीय प्रवासातील प्रत्येक क्षण माझ्यासाठी आशीर्वादासारखा होता. या आठवणी नेहमी माझ्या मनात कायम राहतील."
त्याने आयपीएलमधील आपल्या सर्व संघांचेही (PBKS, KKR, CSK, MI) आभार मानले. त्याने लिहिले –
"इंडियन प्रीमियर लीग हा माझ्या कारकिर्दीचा एक खास भाग राहिला आहे आणि या प्रवासातील प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेतला आहे."
यावेळी पियुष चावलाने बीसीसीआय, यूपीसीए (उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन), जीसीए (गुजरात क्रिकेट असोसिएशन) आणि सर्व प्रशिक्षकांचेही आभार मानले. आपल्या कुटुंबाचा आधार असल्याचे सांगितले आणि वडिलांसाठी एक खास संदेश लिहिला –"माझ्या स्वर्गीय वडिलांचा विशेष उल्लेख करतो. त्यांच्या विश्वासामुळे मला आत्मविश्वास मिळाला. त्यांच्याविना हा प्रवास कधीच शक्य झाला नसता."
पुढे पियुष चावलाने लिहिले की, "आजचा दिवस माझ्यासाठी फार भावनिक आहे, कारण मी अधिकृतपणे क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्तीची घोषणा करतो आहे. जरी मी आता खेळापासून दूर जात असलो, तरी क्रिकेट माझ्या अंतःकरणात सदैव जिवंत राहील. आता मी एका नव्या प्रवासासाठी तयार आहे, जिथे मी या सुंदर खेळातील भावना आणि शिकवण सोबत घेऊन पुढे चाललो आहे."
IPL 2025 मध्ये अनसोल्ड राहिला होता
गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सचा भाग असलेला पियूष चावला याने IPL 2025 साठीही आपले नाव लिलावात दिले होते. त्याचा बेस प्राइस 50 लाख रुपये होता, मात्र कोणत्याही संघाने त्याला खरेदी केले नाही. त्यामुळे तो अनसोल्ड राहिला.
आयपीएल कारकीर्द
पियूष चावला IPL च्या पहिल्या हंगामापासून खेळत आहे. त्याने पंजाब किंग्ज (PBKS) संघातून सुरुवात केली होती. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स (KKR), चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) संघांचा तो भाग राहिला. त्याने एकूण 192 IPL सामने खेळले आणि 192 बळी घेतले.
पियूष चावलाचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा आढावा
पियूषने 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने 9 मार्च रोजी मोहाली येथे इंग्लंडविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळला. त्यानंतर 2007 मध्ये वनडे आणि 2010 मध्ये टी20 पदार्पण केले.
त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत:
3 कसोटी सामने – 7 बळी
25 वनडे सामने – 32 बळी
7 टी20 सामने – 4 बळी
इतर महत्त्वाच्या बातम्या
भर पावसात गौतमी पाटीलचा मोहात पाडणारा डान्स, अलका यागनिक यांच्या गाण्यावर थिरकली VIDEO
















