Video : पाकिस्तानच्या बाबरचं विराटला ओपन चॅलेंज, यावेळी भारताचा पराभव होणार
T20 World cup 2021 : टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. त्यासामन्यापूर्वीच क्रिकेटमधील वातावरण तापलं आहे.
T20 World cup 2021 : टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. त्यासामन्यापूर्वीच क्रिकेटमधील वातावरण तापलं आहे. पाकिस्तानकडून अनेक विधानं येत आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने, विश्वचषकात भारताचा पराभव करणार असं वक्तव्य केलं आहे. बाबर आझमचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हाय-होल्टेज सामन्यापूर्वी बोलताना बाबर म्हणाला की, आतापर्यंत विश्वचषकात जे झालं तो इतिहास आहे. आम्ही पुढील विचार करत आहे. युएईमधील परिस्थिती आम्हाला चांगली माहिती आहे. यावेळी भारताचा पराभव होईल. दरम्यान, आतापर्यंत पाकिस्तानला विश्वचषकात भारताचा एकदाही पराभव करता आलेला नाही.
T20 वर्ल्ड कपमधील भारत –पाकस्थान यांच्यातील सामन्यापूर्वी बाबर आझमला अनेक प्रश्न विचारण्यात आले. विश्वचषकात पाकिस्तान संघाची रणनिती कशी असेल? तसेच भारताविरोधात काय प्लॅनिंग असेल? यासारख्या प्रश्नांची उत्तरे देताना बाबरने विराटच्या नेतृत्वातील भारतीय संघाच्या पराभवाबाबत वक्तव्य केलं. भारताविरोधात सामन्याबाबात प्रश्न विचारलं असता तो म्हणाला, ‘विश्वचषकात आतापर्यंत झालं तो इतिहास आहे. आम्ही पुढील विचार करतोय. विजयाच्या दृष्टीनं आम्ही मैदानात उतरणार आहोत. यावेळी नक्कीच भारताचा पराभव होईल.’ भारताविरोधातील सामन्याच्या प्लॅनिंगबद्दल विचारलं असता बाबर म्हणाला, नेहमीप्रमाणेच क्रिकेट खेळू वेगळा काही प्लॅन नाही. भारताविरोघात फक्त दबाव नियंत्रणात कसा ठेवता येईल, याची रणनिती आखली आहे. स्वत:ला शांत ठेवून संघाला विजय मिळवून देण्यावर भर देणार आहोत.
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणाचं पारडं जड आहे? या प्रश्नावर उत्तर देतान बाबर म्हणाला की, ‘जो संघ चांगला खेळेल तो जिंकेल. पण आमचं जिंकण्याचं ध्येय असेल. युएईमध्ये मागील चार वर्षांपासून आम्ही क्रिकेट खेळत आहोत. येथील परिस्थितीची आम्हाला जास्त माहिती आहे. गोलंदाजही चांगली कामगिरी करत आहे.’
भारत VS पाकिस्तान विश्वचषकातील आकडे काय म्हणतात?
एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकात आतापर्यंत पाकिस्तानकडून भारताचा एकदाही पराभव झालेला नाही. दोन्ही संघ आतापर्यंत 12 वेळा आमने-सामने आले आहेत. एकदिवसीय सामन्यात 7 वेळा तर टी20 मध्ये पाच वेळा दोघांचा सामना झाला आहे.
इंझमाम म्हणतोय भारत विजयाचा दावेदार
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे जगभरातील क्रीडा रसिकांचं लक्ष असते. क्रीडा रसिकांसाठी ही मोठी मेजवानी समजली जाते. यासामन्यापूर्वी पाकिस्तानच्या इंजमामने भारतीय संघाला विश्वचषकाच्या विजयाचा प्रबळ दावेदार म्हटलं आहे. इंजमामच्या मते, युएईमधील परिस्थिती आशियातील परिस्थितीसारखी आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे. इंझमाम उल हक म्हणाला की, भारतीय संघानं दोन्ही सराव सामने सहज जिंकले. ऑस्ट्रेलियाविरोधातील सराव सामन्यात 155 धावांचं लक्ष अतिशय सहज पार केलं. विराट कोहलीला फलंदाजीला यायाचीही गरज भासली नाही. येथील परिस्थिती आशियातील परिस्थितीशी मिळतीजुळती आहे. अशा परिस्तितीत भारतीय संघ जगातील सर्वात धोकादायक संघ ठरु शकतो. टी-20 मधील इतर संघापेक्षा भारतीय संघाचं विजयाची संधी जास्त आहे.