IND vs NZ T20 | न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित, शमीचं कमबॅक
भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये 5 ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळवण्यात येणार आहेत. 24 जानेवारीला मालिकेतला पहिला सामना ऑकलंडमध्ये खेळवण्यात येईल.
मुंबई : न्यूझीलंड दौऱ्यातल्या आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेसाठी 16 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या निवड समितीच्या बैठकीत भारताचा ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेसाठीचा संघ निवडण्यात आला. या मालिकेत उभय संघांमध्ये 5 ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळवण्यात येणार आहेत. 24 जानेवारीला मालिकेतला पहिला सामना ऑकलंडमध्ये खेळवण्यात येईल.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतलेल्या रोहित शर्मा आणि जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. दोन्ही खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर संजू सॅमसनला मात्र वगळण्यात आलं आहे. पाठीच्या दुखापतीमुळे भारत अ संघातून वगळण्यात आलेल्या हार्दिक पंड्याच्या नावाचाही या मालिकेसाठी विचार करण्यात आलेला नाही.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, "भारतीय टी-20 संघात कोणताही आश्चर्यकारक चेहरा नाही. संजू सॅमसनऐवजी रोहित शर्मा संघात परतला आहे, उर्वरित सर्व खेळाडू संघात आहेत."
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टी20 संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वाशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर
तर, उद्यापासूनच टीम इंडियाची पुढची परीक्षा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघांमध्यी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात उद्या म्हणजेच 14 जानेवारीपासून मुंबईत सुरु होणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची भारतीय टीम : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केदार जाधव, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, नवदीप सैनी, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव.