MPL: महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत ४एस पुणेरी बाप्पाचा ईगल नाशिक टायटन्सवर दणदणीत विजय
२१० धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या ईगल नाशिक टायटन्स संघाला हे आव्हान पेलवले नाही.
पुणे: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत अकराव्या दिवशी कर्णधार ऋतुराज गायकवाड(८९ धावा) व अभिमन्यू जाधव (नाबाद ६५ धावा) यांनी केलेल्या झंझावती भागीदारीसह सचिन भोसले(४-१६) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ४एस पुणेरी बाप्पा संघाने ईगल नाशिक टायटन्स संघावर डकवर्थ लुईस पद्धतीने ५९ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वरच्या फळीतील फलंदाज पवन शहा(१२), यश क्षीरसागर(३), रोहन दामले(२०) हे झटपट बाद झाल्यामुळे पुणेरी बाप्पा संघ ३बाद ४० अशा स्थितीत होता. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या अभिमन्यू जाधव व कर्णधार ऋतुराज गायकवाड या आक्रमक फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करत ईगल नाशिक टायटन्सच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ७६चेंडूत १५१धावांची भागीदारी केली. हि भागीदारी एमपीएलमधील या मौसमातील विक्रमी भागीदारी ठरली.
ऋतुराजने अवघ्या ४९चेंडूचा सामना करताना ८९धावांची तुफानी खेळी साकारली. ऋतुराजने झंझावती अर्धशतकी खेळीत चौकार व षटकारांचा पाऊस पाडला. त्यात त्याने ६षटकार व ८चौकार मारले. त्याला अभिमन्यू जाधवने ३९ चेंडूत नाबाद ६५ धावांची अफलातून खेळी करून साथ दिली. ऋतुराजला ८९ धावांवर दिग्विजय देशमुखने झेल बाद केले. सीमारेषेवर कौशल तांबेने त्याचा झेल घेतला. पुणेरी बाप्पा संघाने निर्धारित षटकात ४ बाद २१०धावांचे आव्हान उभे केले. एमपीएलमधील या मौसमातील हि सर्वोच्च धावसंख्या ठरली. तसेच, २००धावांचा टप्पा पार करणारा ४एस पुणेरी बाप्पा संघ दुसरा संघ ठरला.
२१० धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या ईगल नाशिक टायटन्स संघाला हे आव्हान पेलवले नाही. पुणेरी बाप्पाच्या जलदगती गोलंदाज सचिन भोसले(४-१६)च्या भेदक गोलंदाजीमुळे ईगल नाशिक टायटन्स संघ पॉवरप्लेमध्ये ५ बाद ३१ असा बिकट स्थितीत होता. अर्शिन कुलकर्णी(०), मंदार भंडारी(४), साहिल पारख(७), रणजीत निकम(०) हे फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. ईगल नाशिक टायटन्स संघ १० षटकात ५ बाद ५१ अशा स्थितीत असताना पाऊस सुरु झाला. यावेळी ईगल नाशिक टायटन्स डकवर्थ लुईस नियमानुसार ५९ धावांनी पिछाडीवर होता. पावसाच्या व्यत्ययामुळे ४एस पुणेरी बाप्पा संघाने डकवर्थ लुईस पद्धतीने ५९ धावांनी विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक:
४ एस पुणेरी बाप्पा: २०षटकात ४बाद २१०धावा(ऋतुराज गायकवाड ८९(४९,८x४,६x६), अभिमन्यू जाधव नाबाद ६५(३९,२x४,७x६), रोहन दामले २०, पवन शहा १२, दिग्विजय देशमुख २-४९, रेहान खान १-२९, अर्शिन कुलकर्णी १-३३)वि.वि.ईगल नाशिक टायटन्स: १०षटकात ५बाद ५७धावा(अथर्व काळे नाबाद १६, कौशल तांबे नाबाद १५, सचिन भोसले ४-१६, रामकृष्ण घोष १-२०); सामनावीर - ऋतुराज गायकवाड