(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MPL 2023 : केदार जाधव-अंकित बावणे यांची वादळी अर्धशतके, कोल्हापूरचा सोलापूरवर विजय
MPL 2023 :केदार जाधव आणि अंकित बावणे हे कोल्हापूर टस्कर्सच्या विजयाचे शिल्पकार ठरले... सोलापूर संघाला अद्याप एकही विजय मिळवता आला नाही.
MPL 2023 : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2023) क्रिकेट स्पर्धेत केदार जाधव ( 85 धावा) व अंकित बावणे (63 धावा) यांनी केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर कोल्हापूर टस्कर्स संघाने सोलापूर रॉयल्स संघाचा 26 धावांनी पराभव करत दुसऱ्या विजयाची नोंद केली. या विजयामुळे कोल्हापूर टस्कर्स संघाने तीन सामन्यात दोन विजयासह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरूअसलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात सोलापूर रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याआधी कोल्हापूर टस्कर्स संघाने रत्नागिरी जेट्स संघावर पहिला विजय नोंदवला होता. तर सोलापूर रॉयल्स संघाला अजून आपल्या विजयाचे खाते उघडता आले नाही. या निकालानंतर सोलापूर संघाचे आता उर्वरित दोन सामने शिल्लक असून या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. तसेच, इतर सामन्यांचे निकाल त्यांच्याबाजूने जाणे आवश्यक आहे.
सामन्यात भारतीय खेळाडू केदार जाधवने आज लक्षवेधी कामगिरी करत 52 चेंडूत 11 चौकार व 3 षटकारासह 85 धावांची धडाकेबाज शतकी खेळी केली. त्याला अंकित बावणेने 47 चेंडूत 9 चौकार व 2 षटकाराच्या मदतीने 63 धावांची खेळी करून साथ दिली. सलामीच्या जोडीने 97 चेंडूत 154 धावांची भागीदारी करून संघाला भक्कम सुरुवात करून दिली.
आपल्या पहिल्या विकेटच्या शोधात असलेल्या सोलापूर संघाला अखेर 16 व्या षटकात यश मिळाले. फिरकीपटू सुनील यादवने अखेरच्या चेंडूवर अंकित बावणेला झेल बाद केले व ही भागीदारी संपुष्ठात आणली. त्यापाठोपाठ पुढच्याच षटकात सत्यजीत बच्चावने तिसऱ्या चेंडूवर केदारला झेल बाद करून तंबूत परत पाठवले. कोल्हापूर संघ १६.३ षटकात २ बाद १५६ धावा असा सुस्थितीत होता. उर्वरित षटकात सोलापूर रॉयल्स संघाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केले. सोलापुरच्या प्रथमेश गावडे (२-५४), सत्यजीत बच्चाव (१-३२), प्रणव सिंग (१-३५), सुनील यादव (१-३६) यांनी सुरेख गोलंदाजी करत कोल्हापूर संघाला मोठे आव्हान उभारण्यापासून रोखले. कोल्हापूरचे मधल्या फळीतील फलंदाज साहिल औताडे (२१धावा), नौशाद शेख (७धावा), तरणजीत सिंह ढिलोन (१धाव), हे झटपट बाद झाल्यामुळे कोल्हापूर टस्कर्स संघाचा डाव निर्धारित षटकात ५ बाद १८६ धावांवर गडगडला.
याच्या उत्तरात सोलापूर रॉयल्स संघाला २० षटकात ८ बाद १६०धावा करता आल्या. सलामीचा फलंदाज प्रवीण दिशेट्टीने ४५ चेंडूत ३चौकार व ३ षटकारासह ५३ धावांची संयमी खेळी केली. प्रवीणने स्वप्नील फुलपगार(१९धावा)च्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी ३४ चेंडूत ४६धावांची भागीदारी केली. त्यानंतर कोल्हापुरच्या मनोज यादव(३-२६), अक्षय दरेकर(१-३१), आत्मन पोरे(२-२२), निहाल तुसामद(१-२९) यांच्या अचूक माऱ्यापुढे सोलापूर संघाचे फलंदाज कालांतराने एकापाठोपाठ एक बाद होत गेले व त्यामुळे आव्हान अधिकच कठीण झाले. त्यांचा डाव ८बाद १६०धावाच करू शकला व या सामन्यात कोलाहपूर संघाने २६ धावांनी विजय मिळवला. सामनावीर केदार जाधव ठरला.
आज रात्री आठ वाजता रत्नागिरी जेट्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्ज यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात रत्नागिरी जेट्स संघ विजय मिळवून आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक असेल, तर दुसरीकडे छत्रपती संभाजी किंग्ज संघाला अजून सूर गवसला नसून ते आपला पहिला विजय मिळवण्याच्या शोधात आहेत. त्यामुळे दोन्ही संघातील हा सामना नक्कीच चुरशीचा होईल यात शंका नाही.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: कोल्हापूर टस्कर्स: २० षटकात ५बाद १८६धावा (केदार जाधव ८५(५२,११x४,३x६), अंकित बावणे ६३(४७,९x४,२x६), साहिल औताडे २१, प्रथमेश गावडे २-५४, सत्यजीत बच्चाव १-३२, प्रणव सिंग १-३५, सुनील यादव १-३६) वि.वि.सोलापूर रॉयल्स: २० षटकात ८बाद १६०धावा(प्रवीण दिशेट्टी ५३(४५,३x४,३x६), अथर्व काळे नाबाद ३२(२३,४x४), मेहुल पटेल २२, स्वप्नील फुलपगार १९, आत्मन पोरे २-२२, मनोज यादव ३-२६, अक्षय दरेकर १-३१, निहाल तुसामद १-२९); सामनावीर-केदार जाधव; कोल्हापूर टस्कर्स संघ २६ धावांनी विजयी.