Mitali Raj Records: मिताली राजची अनोख्या विक्रमला गवसणी; श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला टाकलं मागे
मितालीने 210 एकदिवसीय सामन्यात 50.64 च्या सरासरीने भारतासाठी 6938 धावा केल्या आहेत. यामद्ये तिने 54 अर्धशतके आणि सात शतके ठोकली आहे.
Cricket News : भारतीय महिला किक्रेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अनोखा आणि मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. मिताली सर्वात जास्त काळ एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द असलेली दुसरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ठरली आहे. याबाबतीत मितालीने श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू सनथ जयसूर्याला मागे टाकलं आहे. या यादीमध्ये भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे.
सचिन तेंडुलकरने डिसेंबर 1989 मध्ये क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. सचिनची एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द 22 वर्ष आणि 91 दिवस होती. तर मिताली राजने जून 1999 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मिताली राजने 26 जून 1999 रोजी आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं होतं. मितालीची एकदिवसीय कारकीर्द सध्या 21 वर्षे 254 दिवस झाली आहे. सनथ जयसूर्याला मागे टाकत ती सर्वाधिक काळ एकदिवसीय क्रिकेट खेळणारी जगातील दुसरी क्रिकेटपटू ठरली आहे. सनथ जयसूर्याची एकदिवसीय कारकीर्द 21 वर्ष 184 दिवस एवढी होती.
कोरोना संकटामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने गेल्या एक वर्षापासून एकही सामना खेळला नव्हता. कोरोनानंतर रविवारी भारतीय महिला संघ रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला जेव्हा भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध लखनौमध्ये पहिला सामना खेळला, तेव्हा मितालीसाठी या मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
मितालीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
मितालीने 210 एकदिवसीय सामन्यात 50.64 च्या सरासरीने भारतासाठी 6938 धावा केल्या आहेत. यामद्ये तिने 54 अर्धशतके आणि सात शतके ठोकली आहे. त्याचबरोबर 10 कसोटी सामन्यांमध्ये मितालीने 51.00 च्या सरासरीने 663 धावा केल्या आहेत. कसोटीत तिची सर्वाधिक धावसंख्या 214 आहे. याशिवाय 89 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मितालीने 2364 धावा केल्या आहेत.टी-20 फॉरमॅटमध्ये मितालीने 17 अर्धशतके झळकावली आहेत.