मुंबई: महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी म्हणजे, 15 नोव्हेंबर 1989 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सचिनने आपल्या धमाकेदार फलंदाजीने अनेकाना प्रभावित केलं. सचिनने केवळ 16 व्या वर्षी कराचीमधील नॅशनल स्टेडिअममध्ये पाकिस्तानच्या विरोधातील कसोटीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला होता. सचिनच्या सोबतीने याच वर्षी सलील अंकोलानेही त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.


या कसोटी सामन्यात सचिन केवळ 15 धावा करुन बाद झाला होता. पाकिस्तानच्या वतीने पहिला सामना खेळत असलेला वकार युनिसने त्याला बाद केलं होतं. हा सामना अनिर्णीत राहिला त्यामुळे सचिनला दुसरी इनिंग खेळण्याची संधी मिळाली नाही.


सचिनच्या बाबतीतील आणखी एक योगायोग म्हणजे 2013 साली 15 नोव्हेंबरच्या दिवशीच सचिनने त्याचा अंतिम क्रिकेटचा सामना खेळला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या वेस्ट इंडिज विरोधातील सामन्यात सचिनने 74 धावा केल्या होत्या. या सामन्यातही सचिनला दुसरा डाव खेळण्याची संधी मिळाली नाही. भारताने तो सामना एक डाव आणि 126 धावांनी जिंकला होता.


बीसीसीआयने एका ट्वीटमध्ये सांगितले की, "आजच्या दिवशीच 1989 साली सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला होता. 2013 साली याच दिवशी हा खेळाडू शेवटच्या वेळी मैदानात उतरला होता. जगभरातील लाखो लोकांना प्रेरित करण्यासाठी धन्यवाद."





दरम्यान, सचिनने भारतासाठी 200 कसोटी आणि 463 वनडे सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्तरावर 100 शतकांची नोंद आहे. वनडे सामन्यात त्याने 18,426 धावा करत 49 शतक ठोकले आहे. कसोटी सामन्यात त्याच्या नावे 15,921 धावा आहेत त्यात 51 शतकांचा समावेश आहे. सचिनने 2006 साली दक्षिण आफ्रिका विरोधात एक टी-20 सामनादेखील खेळला होता. त्यात त्याने 10 धावा केल्या होत्या.


महत्वाच्या बातम्या: