MPL Final: रत्नागिरी जेट्स संघाची MPL मध्ये बाजी; केदार जाधवच्या कोल्हापूर संघाला पराभवाचा धक्का
MPL Final: महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्याच वर्षी रत्नागिरी जेट्स संघाने विजेतेपद पटकावले.
![MPL Final: रत्नागिरी जेट्स संघाची MPL मध्ये बाजी; केदार जाधवच्या कोल्हापूर संघाला पराभवाचा धक्का Maharashtra Premier League final match Ratnagiri jets won final defeat to kedar jadhav led Kolhapur team MPL Final: रत्नागिरी जेट्स संघाची MPL मध्ये बाजी; केदार जाधवच्या कोल्हापूर संघाला पराभवाचा धक्का](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/30/963d6e20842191d951cc4615b6d9edcc1688133221696290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MPL Final: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्यावतीने (MCA) आयोजित केलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्या सिझनमध्ये रत्नागिरी जेट्सने अजिंक्यपद पटकावले. महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अंतिम लढतीत सततच्या पावसामुळे राखीव दिवशी सुद्धा पूर्ण खेळ होऊ शकला नाही. परंतु गुणतालिकेत अव्वल स्थानी असणाऱ्या रत्नागिरी जेट्स संघाने 8 गुणांसह (नेट रनरेट +0.630) जोरावर विजेतेपद संपादन केले.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर पार पडलेल्या या स्पर्धेत गुरुवारी, पावसामुळे अंतिम सामन्याचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे आज सकाळी सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी जेट्स संघाने नाणेफेक जिंकून कोल्हापूर टस्कर्स संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले.
कोल्हापूर संघाची सुरुवात खराब झाली. आघाडीचे फलदांज अंकित बावणे (1 धाव), साहिल औताडे (5 धावा) हे स्वस्तात बाद झाले. रत्नागिरीचा डावखुरा फिरकीपटू कुणाल थोरातने या दोघांना बाद करून कोल्हापूर संघाला 3.2 षटकात 2 बाद 12 धावा असे अडचणीत टाकले. कोल्हापूर संघ 7 षटकात 2 बाद 43 धावांवर असताना पाऊस पुन्हा सुरु झाला. एका बाजूने केदार जाधवने संघाची धुरा सांभाळली असताना मात्र दुसऱ्या बाजूने नौशाद शेख (12 धावा), सिद्धार्थ म्हात्रे (0), अक्षय दरेकर (4 धावा) हे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे कोल्हापूर संघ 10.2 षटकात 5 बाद 57 धावा अशा स्थितीत होता.
केदार जाधव 28 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 32 धावांवर असताना रत्नागिरीच्या विजय पावलेने त्याला त्रिफळाचित करून अडसर दूर केला. त्यानंतरही कोल्हापूरची फलंदाजी कोसळली. निखिल मदास ( 8 धावा), मनोज यादव ( 2 धावा) हे देखील एकेरी धावसंख्येवर बाद झाले. रत्नागिरी जेट्स संघाकडून प्रदीप दाढे (3-24), कुणाल थोरात (2-22), निकित धुमाळ (2-12), विजय पावले (1-8) यांनी प्रभावी मारा केला. कोल्हापूर संघ 16 षटकात 8 बाद 80 धावांवर खेळत असताना पुन्हा पाऊस सुरु झाला. सतत सुरु असलेल्या संततधार पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे गुणतालिकेतील नेटरेट्सच्या आधारे रत्नागिरी जेट्स संघाने विजेतेपद पटकविले.
स्पर्धेतील विजेत्या रत्नागिरी जेट्स संघाला करंडक आणि 50 लाख रुपये, तर उपविजेत्या कोल्हापूर टस्कर्स संघाला करंडक आणि 25 लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. एमपीएलमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज अंकित बावणे ठरला. त्याने 363 धावा पटकावल्या. तर सचिन भोसले हा सर्वोत्कृष्ट गोलंदज ठरला. त्याने स्पर्धेत 14 गडी बाद केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमसीएचे उपाध्यक्ष किरण सामंत, एमपीएलचे चेअरमन सचिन मुळ्ये, सचिव शुभेंद्र भांडारकर, सहसचिव संतोष बोबडे, खजिनदार संजय बजाज आणि जान्हवी धारिवाल बालन, रत्नागिरी संघाचे मालक राकेश, राजन नवानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांनी सर्व संघ मालक, खेळाडू, एमसीए अपेक्स सदस्य, ग्राउंड स्टाफ, सर्व प्रेक्षकांचे आभार मानले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)