KKR want KL Rahul : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेची कर्णधारपदावरुन उचलबांगडी? इंग्लंडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या खेळाडूच्या मागे लागला शाहरुख खान, 25 कोटींची करणार डील?
KL Rahul IPL 2026 News : शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्ससाठी आयपीएल 2025 हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला.

KKR want KL Rahul IPL 2026 : शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्ससाठी आयपीएल 2025 हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. संघाचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर पंजाब किंग्जकडे गेल्यानंतर केकेआरला अजिंक्य रहाणेवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवावी लागली. परिणामी संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरने 2024 मध्ये आयपीएल विजेतेपद पटकावलं होतं. मात्र त्यानंतर संघाने त्यांना रिलीज केलं आणि पंजाब किंग्जने त्यांना तब्बल 26.75 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतलं. यंदाच्या हंगामात पंजाब फायनलपर्यंत पोहोचला, पण तिथे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे केकेआरने मात्र आठव्या स्थानावर हंगामाची निराशाजनक समाप्ती केली.
आयपीएल 2025 च्या हंगामात केकेआरने काही मोठे निर्णय घेतले. यामध्ये सर्वात लक्षवेधी निर्णय म्हणजे वेंकटेश अय्यरला 23.75 कोटी रुपयांना खरेदी करणं. त्यामुळे सर्वांनाच वाटत होतं की वेंकटेशला संघाचं नेतृत्व दिलं जाईल. पण केकेआरने सर्वांना आश्चर्यचकित करत अजिंक्य रहाणेच्या हाती कर्णधारपद सोपवलं. आता समोर येतंय की केकेआर व्यवस्थापन आयपीएल 2026 साठी काही वेगळं, धक्कादायक आणि ठोस पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
इंग्लंडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या खेळाडूच्या मागे लागला शाहरुख खान
टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, केकेआर ट्रेड डील अंतर्गत केएल राहुलला मिळवू शकते. राहुल 2025 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता, जिथे त्याला 14 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की, केकेआर केएल राहुलसाठी 25 कोटी रुपये खर्च करण्यास तयार आहे. केएल राहुल हा केवळ एक चांगला फलंदाजच नाही तर तो कर्णधार आणि यष्टीरक्षकाची भूमिका देखील बजावू शकतो, म्हणून केकेआर त्याच्यासाठी एवढी मोठी रक्कम देण्यास तयार असल्याचे म्हटले जाते.
केएल राहुलची आयपीएलमधील कामगिरी
केएल राहुल 2013 पासून आयपीएल खेळत आहे, परंतु 2018 पासून त्याच्या बॅटमधून सतत धावा निघत आहेत. त्याने चार वेळा 600 पेक्षा जास्त धावा आणि तीन वेळा 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आयपीएल 2025 मध्ये त्याने 13 सामन्यांमध्ये 539 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
केकेआरने चंद्रकांत पंडित आणि भरत अरुण यांच्याशी तोडलं नातं
आयपीएल 2025 हंगामानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघ व्यवस्थापनात मोठे बदल झाले आहेत. संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्याशी केकेआरने आपली वाट वेगळी केली आहे. पंडित तीन हंगामांपासून संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र आता त्यांचा फ्रेंचायझीचा निरोप घेतला आहे. तसेच, भारतीय संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण हेदेखील केकेआरमधून बाहेर पडले आहेत. त्यांनी आता लखनऊ सुपर जायंट्स संघात नव्या भूमिकेसह प्रवेश केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केकेआर आता नव्या प्रशिक्षक मंडळाच्या शोधात आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात येतो आहे की, ऑयन मॉर्गन संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक बनू शकतात, तर माजी वेगवान गोलंदाज जहीर खान यांना गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी दिली जाऊ शकते. या बदलांमुळे केकेआरच्या संघरचनेत मोठा उलथापालथ होण्याची शक्यता आहे आणि संघ नव्या दमाने आयपीएल 2026 मध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.
हे ही वाचा -
Ind vs Eng 5th Test : कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात निवड, पण अजूनही 'वॉटरबॉय'चे काम; स्टार खेळाडूला गौतम गंभीर कुजवतोय?





















