Eng vs Ind 4th Test : करुण नायर अपयशी, साई सुदर्शनलाही संधी, मग अभिमन्यूचं काय? चौथ्या कसोटी स्वप्न होणार साकार, गंभीर देणार एन्ट्री?
England vs India 4th Test : टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तीन सामने संपले आहे.

England vs India 4th Test : टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तीन सामने संपले आहे. त्यातील दोन सामने इंग्लंडने जिंकले असून भारताला फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. मालिकेतील आणखी दोन सामने बाकी आहेत. या मालिकेचा अंतिम निकाल काय लागेल, हे तर येणारा काळच ठरवेल. मात्र या सगळ्यात एक खेळाडू आहे, ज्याच्या प्रतीक्षेचा अंत काही केल्या होताना दिसत नाही. दिवस मागे सरत आहेत, पण भारताची कॅप घालण्याचं स्वप्न अजूनही अधुरं आहे.
अभिमन्यू ईश्वरन अजूनही संधीच्या प्रतीक्षेत
शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताने तीन सामने खेळले, पण अभिमन्यू ईश्वरन अजूनही ड्रेसिंग रूममध्येच बसून संधीची वाट पाहत आहे. ही पहिलीच वेळ नाहीये की त्याला बाहेर बसावं लागत आहे. याआधी जेव्हा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती, तेव्हाही अभिमन्यू संघाचा भाग होता. तेव्हाचंही चित्र असंच होतं, मेहनत केली, संघात नाव आलं, पण खेळायला मिळालं नाही. भारत परतला, मालिकाही हातून गेली, पण अभिमन्यू तसाच राहिला डेब्यूच्या प्रतीक्षेत.
संघात अनेक झाले बदल, पण अभिमन्यूचा नंबर नाहीच आला
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून इंग्लंड दौऱ्यापर्यंत भारतीय संघात मोठे बदल झाले. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज निवृत्त झाले. शुभमन गिलकडे कसोटी संघाची जबाबदारी आली. अनेक नवोदित खेळाडूंना संधी मिळाली. त्यात अभिमन्यूलाही पुन्हा संघात स्थान मिळालं. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा अजून मिळालेली नाही. जोपर्यंत मैदानात पदार्पण होत नाही, तोपर्यंत भारताची कॅपही येणार नाही, हे स्पष्ट आहे.
करुण नायर अपयशी, साई सुदर्शनलाही संधी, मग अभिमन्यूचं काय?
विशेष बाब म्हणजे संघात नव्याने आलेल्या साई सुदर्शनला लगेचच पदार्पणाची संधी मिळाली. करुण नायर, जो जवळपास आठ वर्षांनी संघात परतला, त्यालाही सलग तीन सामने मिळाले. मात्र, साईला पहिल्याच सामन्यात संधी मिळूनही तो चमकू शकला नाही. करुण नायरही तिन्ही सामन्यांत सपशेल अपयशी ठरला आहे. तरीदेखील अभिमन्यूला अजूनही डावललं जातंय. जेव्हा बाकी सर्व खेळाडूंना संधी दिली जात आहे, तेव्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनला एक-दोन संधी देण्यात काय हरकत आहे?
अखेर किती दिवस वाट बघायची?
अभिमन्यू ईश्वरनचं कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठीचं संघर्षमय प्रवास कुठेतरी पूर्णत्वास यायला हवा. जेव्हा करिअरची सर्वोत्तम फॉर्मात असलेला खेळाडू डावलला जातो, तेव्हा त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम होणं स्वाभाविक आहे. म्हणूनच, आता तरी संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवून त्याला डेब्यू करण्याची संधी द्यायला हवी.





















