IPL मध्ये कोट्यवधींची माया उडवली, खेळाडूही मालामाल, पण दिव्यांग खेळाडूंना मूलभूत सुविधा नाही, क्लब ढुंकूनही पाहत नाही
आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात महागडी आणि लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. प्रत्येक वर्षी आयपीएलमध्ये अब्जावधींची उलाढाल सहज होते.

आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात महागडी आणि लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. प्रत्येक वर्षी आयपीएलमध्ये अब्जावधींची उलाढाल सहज होते. अनेक तरुण क्रिकेटपटू एकदम स्टार बनतात. पण याच प्रकाशझोतातून दूर, एक शांत संघर्ष सुरू आहे. जिथे दिव्यांग क्रिकेटपटू दररोज ओळख, मूलभूत सुविधा आणि पाठिंब्यासाठी झगडत आहेत.
अलीकडेच, आयपीएल 2025 मध्ये ऑटो-रिक्शाचालकाचा मुलगा विघ्नेश पुथुर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळताना चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात तीन महत्वाची बळी घेतल्यानंतर चर्चेत आला. त्याची कहाणी प्रेरणादायी आहे. संघर्ष, चिकाटी आणि संधीचे रूपांतर कसे शक्य आहे याचे जिवंत उदाहरण. आयपीएल आणि मुंबई इंडियन्स संघाने विघ्नेशला एक मंच दिला आणि त्याने तो संधीचा पुरेपूर फायदा घेतला.
पण बऱ्याच दिव्यांग क्रिकेटपटूंसाठी असा मंच अजूनही एक स्वप्नवतच आहे. सदाशिव शिंदे यांचे उदाहरण घ्या. अपघातात एक पाय गमावल्यावरही ते अजूनही ऑटो-रिक्शा चालवतात, कारण त्यांचं घर चालवायचं आहे. पण ते फक्त संघर्ष करणारे नाहीत, ते मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघाचे खेळाडूही आहेत. त्यांच्यात प्रतिभा आणि आवड असूनही, सदाशिवला कधीच त्यांच्या 'सामान्य' सहकाऱ्यांप्रमाणे पाठिंबा किंवा प्रसिद्धी मिळाली नाही.
आणखी एक नाव म्हणजे अशोक गजमल. पोलिओग्रस्त यष्टीरक्षक-बल्लेबाज. ते स्वतःचं छोटंसं चप्पलांचं दुकान चालवतात. त्यांचं सगळ्यात मोठं स्वप्न? वानखेडे स्टेडियमवर खेळणं. पण अशी स्वप्नं अनेकदा अपूर्णच राहतात, कारण कौशल्य किंवा जिद्द नसते म्हणून नाही, तर संधी आणि प्रणालीगत पाठिंबा नसल्यामुळे.
मुंबई आणि भारतभरातील क्रिकेट प्रशासनाकडे सुविधा आहेत, निधी आहे आणि संविधानिक तरतुदीही आहेत. ज्यांच्या आधारे दिव्यांग क्रिकेटला चालना दिली जाऊ शकते. पण जे उघडपणे दिसत नाही, ते म्हणजे इच्छाशक्ती. यावर मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघाचे कर्णधार राहुल रमुगडे अगदी मुद्देसूदपणे सांगतात की, "क्रिकेट प्रशासनाकडे संपूर्ण देशभरातील दिव्यांग क्रिकेटपटूंच्या आयुष्यात बदल घडवण्याची मोठी संधी आहे. पण समावेश आणि दूरदृष्टीचाच अभाव आहे."
राहुल स्वतः पोलिओमुळे दोन्ही पायांनी त्रस्त आहेत, शिवाय स्कोलिओसिसही आहे. तरीसुद्धा ते आपल्या संघाचं नेतृत्व जिद्दीने करतात. त्यांच्या या प्रवासातून हे सिद्ध होतं की, जेव्हा आवड आणि चिकाटी एकत्र येतात, तेव्हा अशक्यही शक्य होतं. पण तरीही ते आणि त्यांचे सहकारी अजूनही त्याच अडचणींना सामोरे जात आहेत. आर्थिक पाठिंबा नाही, सुविधा अपुऱ्या आणि ओळखही मिळत नाही.
क्रिकेटविश्वाला संघर्षात यश मिळवणाऱ्या कहाण्या खूप प्रिय आहेत. पण अशा कहाण्या फक्त आयपीएल किंवा मुख्य प्रवाहातील खेळाडूंपुरत्याच मर्यादित असू नयेत. कारण सदाशिव, अशोक आणि राहुल यांच्यासारखे अनेक नायक आहेत, ज्यांचं कष्टप्रद आणि प्रेरणादायी प्रवासही तितकाच गौरव करण्यासारखा आहे.
आता वेळ आली आहे की क्रिकेट मंडळे, फ्रँचायझी, प्रायोजक आणि सामान्य जनता यांना आपली दृष्टी विस्तृत करावी लागेल. फक्त यशाचा गौरव करणे पुरेसे नाही, तर प्रत्येक प्रकारच्या क्रिकेटचं संगोपन करणंही गरजेचं आहे. खरी समावेशकता म्हणजे प्रत्येक खेळाडूला, तो कोणत्याही क्षमतेचा असो, आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणं. शेवटी, क्रिकेट म्हणजे फक्त धावा आणि विकेट्स नाही. ती आहे जिद्द, आत्मा आणि हार मानू न देणारी इच्छाशक्ती. आणि ही मूल्यं भारतातील दिव्यांग क्रिकेटपटूंपेक्षा चांगल्या प्रकारे कोणीही दाखवू शकत नाही.





















