India Vs South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊनमध्ये रविवारी (23 जानेवारी) खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात भारताला 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. पराभवाची जखम ताजी असताना भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का लागलाय. स्लो ओव्हर रेटसाठी भारतीय संघाला मॅच फीच्या 40 टक्के दंड ठोठावण्यात आलाय. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्टनं भारतीय संघाविरोधात ही कारवाई केलीय. एमिरेट्सच्या आयसीसी एलिट पॅनल ऑफ मॅच रेफ्रीच्या अँडी पायक्रॉफ्टनं भारताला निर्धारित वेळेत दोन षटकं कमी टाकल्याबद्दल शिक्षा सुनावली.


खेळाडू आणि सहाय्यक संघातील सदस्यांसाठी आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार, प्रत्येक षटकाला उशीर झाल्यास खेळाडूच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड आकारला जातो. राहुलनं आयसीसीची ही कारवाई मान्य केली. त्यामुळं औपचारिक सुनावणीची गरज नव्हती.


याआधी दक्षिण आफ्रिका संघाला दुसऱ्या वनडेत दंड ठोठावण्यात आला होता. आयसीसीने शनिवारी स्लो ओव्हर रेटसाठी दक्षिण आफ्रिकेला मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावला. बावुमा यांनी आरोप स्वीकारला होता. त्यामुळं औपचारिक सुनावणीची गरज नव्हती. मैदानावरील पंच मारायस इरास्मस आणि अॅड्रियन होल्डस्टॉक यांच्याशिवाय तिसरे पंच बोंगानी झेले आणि चौथे पंच अलाउद्दीन पालेकर यांनी शुक्रवारी सामन्यानंतर आरोप केले होते.


या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं 49.5 षटकांत 287 धावा केल्या. दक्षिण सलामीवीर क्विंटन डी कॉकनं 124 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाचा डाव 283 धावांवर आटोपला. विराट कोहली, शिखर धवन आणि दीपक चहर यांचं अर्धशतक व्यर्थ ठरलं. या पराभवासह भारतानं तीन सामन्यांची मालिका 0-3 अशा फरकानं गमावली.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha