India Vs South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला ४ धावांनी पराभव पत्करावा लागला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेनं 3-0 असं निर्भेळ यश संपादन केलंय. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा क्विंटन डीकॉक (130 चेंडूंत 124 धावा) सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. परंतु, या सामन्यात भारताला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन जाणाऱ्या दिपक चाहरनं भारतीय चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्यानं या सामन्यात दीपक चाहरनं एक झुंझार अर्धशतक (34 चेंडूत 54 धावा) लगावलं खरं पण संघाला विजय मिळवून देण्यात तो थोडक्यात हुकला. भारतानं सामना गमवल्यानंतर दीपक चाहरला मैदानातच अश्रू अनावर झाले. दीपक चाहरचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दिलेल्या 288 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा डाव 49.2 षटकात आटोपला. भारताचा कर्णधार केएल राहुल (9 धावा) स्वस्तात माघारी परतल्यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि विराट कोहलीनं संघाचा डाव सावरला. या जोडीनं दुसऱ्या विकेट्ससाठी 98 धावांची भागीदारी केली. मात्र, अँडिले फेहलुकवायोनं एकाच षटकात धवन आणि ऋषभ पंत यांना बाद केलं. कोहलीला डावखुरा फिरकीपटू केशव महाराजनं माघारी धाडत भारताची 4 बाद 156 अशी अवस्था केली. यानंतर सूर्यकुमार यादव (39) आणि श्रेयस अय्यर (26) हे मुंबईकर फलंदाज काही चांगले फटके मारून बाद झाले. भारतानं 223 धावांवर 7 विकेट्स गमावले. त्यावेळी संघाचा तारणहार म्हणून आलेल्या दीपक चाहरने 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 54 धावा करत संघाचा विजय जवळपास निश्चित करून दिला. पण, मोक्याच्या क्षणी दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दिपकला बाद केलं. त्यावेळी भारताला 10 धावांची गरज होती आणि केवळ दोन विकेट्स शिल्लक होत्या. दरम्यान, भारताल ऑलआऊट करून दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला.


ट्वीट- 



संघाच्या पराभवानंतर दीपक अत्यंत निराश दिसला आणि चेहरा लपवत खुर्चीवर बसून राहिला. पराभवानंतरचा दिपकचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांनीही दीपकच्या समर्थनार्थ वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. दिपक चाहरनं भारतीय संघासाठी चांगली खेळी केली. गोलंदाज असतानाही त्यानं एका फलंदाजासारखा खेळ केला. त्याच्या आऊट झाल्यानंतर भारताच्या हातातून विजय निसटला, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर दिली. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha