India vs Pakistan WCL 2025: आम्ही खेळणार नाही...सेमीफायनल खेळण्यास भारताचा नकार; पाकिस्तानचा थेट फायनलमध्ये प्रवेश!
India vs Pakistan WCL 2025: कोणत्याही परिस्थितीत मैदानावर पाकिस्तान विरुद्ध खेळणार नाही, असं भारतीय खेळाडूंनी आयोजकांना सांगितले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा सामना रद्द करण्यात आला.

India vs Pakistan WCL 2025: इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL 2025) च्या उपांत्य फेरीत इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्सचा (Pakistan Champions vs India Champions) आज सामना रंगणार होता. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानसोबत उपांत्य फेरीचा सामना खेळण्यास नकार दिला आहे. इंडिया चॅम्पियन्सच्या संघाने अधिकृतपणे स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. त्यामुळे पाकिस्तानला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे एप्रिल 2025 मध्ये दहशतवादी हल्ला झाला, ज्यामुळे संपूर्ण देश हादरला. हल्ल्यानंतर निर्माण झालेला राजकीय आणि भावनिक दबाव भारताच्या या निर्णयामागे असल्याचे मानले जाते. हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान विरुद्ध वातावरण तापले होते आणि त्याचा परिणाम या स्पर्धेतही दिसून आला आहे. कोणत्याही परिस्थितीत मैदानावर पाकिस्तान विरुद्ध खेळणार नाही, असं भारतीय खेळाडूंनी आयोजकांना सांगितले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा सामना रद्द करण्यात आला. दरम्यान, पहिला उपांत्य फेरीचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येणार होता. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
Semi - Finals Update ! pic.twitter.com/lTmh3j0sSP
— World Championship Of Legends (@WclLeague) July 30, 2025
गेल्या हंगामात भारताने जिंकलेले विजेतेपद-
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सचे हे दुसरे सत्र आहे. पहिल्या हंगामात इंडिया चॅम्पियन्सने शानदार कामगिरी केली होती आणि अंतिम फेरीत पाकिस्तानला हरवून जेतेपद जिंकले होते. यावेळीही भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता, परंतु यंदा भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला.





















