(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारत-पाकिस्तान हाय होल्टेज सामन्यात कोण चमकणार ? या पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा
India vs Pakistan, Asia Cup 2023 : जसप्रीत बुमराहच्या कमबॅकमुळे गोलंदाजीला धार आली आहे. शनिवारी होणारा हायहोल्टेज सामना रंगतदार होणार, यात शंकाच नाही.
India vs Pakistan, Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात उद्या हायहोल्टेज सामना होणार आहे. चार वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकदिवसीय सामना होणार आहे. पाकिस्तानचा संघ सध्या आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. त्याशिवाय पाकिस्तान संघाने नेपाळविरोधात 238 धावांनी विजय मिळून दणक्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल. पण भारतीय संघाचेही पारडेही जड मानले जात आहे. जसप्रीत बुमराहच्या कमबॅकमुळे गोलंदाजीला धार आली आहे. शनिवारी होणारा हायहोल्टेज सामना रंगतदार होणार, यात शंकाच नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आयसीसी सामने वगळता इतर सामने होत नाही. त्यामुळे दोघांमधील लढत पाहण्यासाठी चाहत्यांचा उत्साह वाढलेला असतो. भारतीय संघ चार वर्षानंतर पाकिस्तानविरोधात वनडेमध्ये दोन हात करत आहे. या सामन्यात कोणता खेळाडू चांगली कामगिरी करतो, याकडे सर्वांची नजर असेलच.. पण पाच खेळाडूंच्या कामगिरीमुळे सामन्याचा निकाल बदलू शकतो. या आघाडीच्या पाच खेळाडूबद्दल जाणून घेऊय़ात...
1 – विराट कोहली
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहलीची सर्वाधिक चर्चा होते. विराट कोहली याने पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. आशिया चषकातील विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या पाकिस्तानविरोधातच आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या सामन्यातही विराट कोहलीकडून मोट्या खेळीची आपेक्षा असेल. विराट कोहली सध्या भन्नाट फॉर्मात आहे. पाकिस्तानविरोधात विराट कोहलीने ५० पेक्षा जास्त सरासरीने धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहली भारतासाठी मॅच विनिंग खेळी करु शकतो. विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा आहेत.
2 – बाबर आजम
नेपाळ विरोधात १५१ धावांची खेळी करत बाबार आझम याने आशिया चषकाची दणक्यात सुरुवात केली. पण बाबरपुढे आता भारतीय आक्रमणाचे आव्हान असेल. नेपाळच्या दुबळ्या गोलंदाजीपुढे बाबरने धावांचा पाऊस पाडला. आता भारताविरोधात बाबर कशी कामगिरी करतो हे पाहणे आत्सुक्याचे ठरणार आहे. वनडेमध्ये बाबरला भारताविरोधात एकही अर्धशतक ठोकता आलेले नाही. आता शनिवारी होणाऱ्या सामन्यात बाबर कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात.
3 – रोहित शर्मा
भारताचा कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध भारतासाठी सक्रिय असणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. रोहित शर्माने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्धच्या 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये 51.42 च्या सरासरीने 720 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 6 अर्धशतके आणि 2 शतके झळकली आहेत. हायहोल्टेज सामन्यात कर्णधाराच्या कागिरीकडे लक्ष असेल.
4 – शाहिन आफ्रिदी
पाकिस्तानच्या गोलंदाजीचे नेतृत्व करणारा शाहिन आफ्रिदी भारतीय फलंदाजांसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे बोलले जात आहे. शाहिनचा सध्याचा फॉर्मही चांगलाच दिसत आहे. नेपाळविरुद्धच्या सामन्यात शाहिनने डावाच्या पहिल्याच षटकात नव्या चेंडूने दोन बळी घेतले होते. शनिवारी मोक्याच्या सामन्यात शाहिनच्या गोलंदाजीवर पाकिस्तानचा विजय अवलंबून असेल.
5 – जसप्रीत बुमराह
बूम बूम बुमराह मोठ्या कालावधीनंतर कमबॅक करतोय.. आशिया चषकात पाकिस्तानविरोधात बुमराह कशी गोलंदाजी करतो... याकडे क्रीडा चाहत्यांच्या नजरा आहेत. बुमराहच्या फिटनेससोबतच त्याचा फॉर्मही विश्वचषकापूर्वी संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अशा परिस्थितीत बुमराह पाकिस्तानविरुद्धच्या दडपणाने भरलेल्या सामन्यात कशी कामगिरी करतो, हे टीम इंडियासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. आतापर्यंत एकदिवसीय कारकिर्दीत बुमराहने पाकिस्तानविरुद्धच्या 5 सामन्यांमध्ये 48.75 च्या सरासरीने केवळ 4 विकेट्स घेतल्या आहेत. ही कामगिरी सुधारण्याची संधी जसप्रीत बुमराहकडे असेल.