IND Vs ENG : टीम इंडिया अडचणीत? गुडघ्याच्या दुखापतीमुळं स्कॅन करण्यासाठी रवींद्र जाडेजा रुग्णालयात
IND Vs ENG : रवींद्र जाडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. जाडेजाला झालेली दुखापत किती गंभीर आहे, हे स्कॅन रिपोर्ट आल्यानंतरच कळणार आहे.
IND Vs ENG : इंग्लंड विरोधातील लीड्स टेस्टमध्ये भारतीय संघाला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियावर एक डाव आणि 76 धावांनी मात करत इंग्लंडच्या संघानं कसोटी मालिकेत बरोबरी साधली आहे. पराभवासोबतच आता भारतीय संघाच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर भारताचा स्टार स्पिनर रवींद्र जाडेजाच्या गुडघ्याचं स्कॅन करण्यात आलं. जाडेजाला झालेली दुखापत किती गंभीर आहे आणि पुढील सामन्यात तो खेळणार की, नाही याची माहिती स्कॅन रिपोर्ट आल्यावरच मिळेल.
टीम इंडियाच्या वतीनं रवींद्र जाडेजाच्या दुखापतीबाबत स्पष्ट करण्यात आलं आहे. इंग्लंडमध्ये टीम इंडियाशी निगडीत एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, "रवींद्र जाडेजाच्या गुडघ्याचं स्कॅन करण्यात आलं आहे. त्याच्या तब्येतीबाबत इतर माहिती स्कॅन रिपोर्ट आल्यानंतरच दिली जाईल"
अश्विनच्या पुनरागमनाची शक्यता
सामना सुरु असताना काही वेळासाठी जाडेजा मैदानाबाहेर गेल्याचं पाहायला मिळालं. पण काही वेळातच तो परतला. त्यानं 32 ओव्हर्समध्ये इंग्लंडच्या एकमेव डावादरम्यान दोन विकेट घेतल्या. जाडेजाकडे एका ऑलराउंडर खेळाडू म्हणून पाहिलं जातं. संघातही ऑलराउंडर म्हणून त्याचा समावेश करण्यात आला आहे. जाडेजाच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळं अश्विनऐवजी कसोटी संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत जाडेजा फलंदाज म्हणून यशस्वी ठरला आहे. परंतु, गोलंदाज म्हणून तो फारशी चांगली खेळी करु शकलेला नाही.
जाडेजाची दुखापत गंभीर असेल तर आर. अश्विनला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकतं. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरोधात खेळवण्यात आलेल्या टेस्ट सीरीजमध्ये आर. अश्विनने गोलंदाजीसह फलंदाजीतही उत्तम कामगिरी केली होती, त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत त्याला संघाबाहेर ठेवल्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
तिसऱ्या कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव, इंग्लंडचा एक डाव 76 धावांनी विजय
इंग्लंड क्रिकेट संघाने लीड्समधील लॉर्ड्सवरील पराभवाचा बदला घेतला आहे. हेडिंग्ले लीड्स येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने टीम इंडियाचा दारुण पराभव केला. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 78 धावा करता आल्या. यानंतर इंग्लंडने त्यांच्या फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पहिल्या डावात 432 धावा केल्यावर 354 धावांची मोठी आघाडी घेतली. प्रत्युत्तरादाखल तिसऱ्या दिवशी झुंज देणाऱ्या टीम इंडियाने चौथ्या दिवशी शस्त्रे म्यान केली. संपूर्ण संघ अवघ्या 278 धावांवर बाद झाला. यासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
अशा प्रकारे इंग्लंडने तिसरी कसोटी एक डाव आणि 76 धावांनी जिंकली. इंग्लंडच्या या विजयाचा नायक वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन होता. त्याने पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. याशिवाय क्रेग ओव्हरटनने दुसऱ्या डावात तीन विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :