Eng vs Ind 4th Test Day 1 Stumps : जैस्वाल-सुदर्शन चमकले, इंग्लंडचा जोरदार पलटवार! ऋषभ पंतला दुखापत, मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी काय घडलं?
मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याचा पहिला दिवस चढ-उतारांनी भरलेला ठरला.

England vs India 4th Test Day 1 Stumps : मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याचा पहिला दिवस चढ-उतारांनी भरलेला ठरला. तीन सत्रांत सामना वेगळ्या वळणांवर गेला. पहिल्या सत्रात भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलंच थोपवलं, पण दुसऱ्या सत्रात इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत भारताच्या तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. दिवसाअखेर ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे भारतीय फॅन्सना काळजीत टाकणारा क्षण अनुभवावा लागला. खेळ थांबला तेव्हा पहिल्या दिवशी भारताने पहिल्या डावात चार विकेट गमावल्यानंतर 264 धावा केल्या. रवींद्र जडेजा (19) आणि शार्दुल ठाकूर (19) खेळत आहेत.
Stumps on the opening day of the 4th Test in Manchester!
— BCCI (@BCCI) July 23, 2025
115 runs in the final session as #TeamIndia reach 264/4 at the end of Day 1.
Join us tomorrow for Day 2 Action 🏟️
Scorecard ▶️ https://t.co/L1EVgGu4SI#ENGvIND pic.twitter.com/1KcCixeW7Q
पहिल्या सत्रात भारतीय सलामीची चमक
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाहुण्यांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीवीर यशस्वी जैस्वाल व केएल राहुलने अतिशय संयमी पण ठाम सुरुवात केली. दोघांनीही इंग्लंडच्या अनुभवसंपन्न आघाडीच्या गोलंदाजांचा सामना करत अप्रतिम अर्धशतकी भागीदारी रचली. पहिल्या सत्रात एकही विकेट न गमावता भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला. जेवणाच्या सुट्टीपर्यंत यशस्वी 36 (74 चेंडू) आणि राहुल 40 (82 चेंडू) धावांवर नाबाद होते.
दुसऱ्या सत्रात इंग्लंडचा डंका!
पण, दुपारच्या सत्रात इंग्लंडने जोरदार पुनरागमन केलं. क्रिस वोक्सने राहुलला 46 धावांवर पायचीत करत पहिली विकेट घेतली. त्यानंतर लियाम डॉसनने जैस्वालला 58 धावांवर बाद करत भारताला दुसरा झटका दिला. काही वेळातच बेन स्टोक्सच्या चेंडूवर शुभमन गिल 12 धावांवर एलबीडब्ल्यू झाला. या सत्रात भारताने 3 महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. चहापानाच्या वेळी स्कोअर 149/3 होता.
Tea on Day 1 of the 4th #ENGvIND Test! #TeamIndia move to 149/3, with Sai Sudharsan (26*) and vice-captain Rishabh Pant (3*) in the middle!
— BCCI (@BCCI) July 23, 2025
Third & final session of the Day to commence 🔜
Updates ▶️ https://t.co/L1EVgGu4SI @sais_1509 | @RishabhPant17 pic.twitter.com/ADjEP7VLF6
तिसऱ्या सत्रात पंतचा झटका
शेवटच्या सत्रात सर्वात मोठी चिंता भारतीय संघासाठी ठरली ती ऋषभ पंतची दुखापत. 37 धावांवर खेळत असताना, क्रिस वोक्सचा एक चेंडू थेट त्याच्या पायावर लागला. वेदनेने विव्हळत असलेला पंत खेळू शकला नाही आणि त्याला 'रिटायर्ड हर्ट' व्हावं लागलं. त्यानंतर रवींद्र जडेजा मैदानात आला आणि साई सुदर्शनसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहे. पण बेन स्टोक्सने साई सुदर्शनला आऊट केले. 151 चेंडूत सात चौकारांसह 61 धावा काढल्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतला.
Maiden Test FIFTY for Sai Sudharsan! 👏 👏
— BCCI (@BCCI) July 23, 2025
A solid knock from the #TeamIndia left-handed batter in Manchester 💪
Updates ▶️ https://t.co/L1EVgGtx3a#ENGvIND | @sais_1509 pic.twitter.com/cH8OgpN4eA
इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाने 4 बाद 264 धावा केल्या आहेत. खेळ थांबला तेव्हा रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर सध्या क्रीजवर आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ पाहता, सामना अजूनही संतुलनात आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळात कोणता संघ वर्चस्व गाजवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भारतीय फॅन्ससाठी मात्र पंतची प्रकृती ही सध्या सर्वात मोठी चिंता आहे.





















