(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ind vs Aus: यशस्वी जैस्वालचं दमदार शतक; ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची भक्कम आघाडी
India vs Australia 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे.
India vs Australia 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाची सुरुवातही भारतासाठी चांगली झाली. यशस्वी जैस्वालने कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. ऑस्ट्रेलियन भूमीवर त्याचे हे पहिले शतक आहे. तर ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटीत शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय ठरला आहे. केएल राहुलसोबत त्याने भारतीय सलामीवीर म्हणून सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रमही केला.
पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र संपले आहे. केएल राहुलच्या रूपाने टीम इंडियाने या सत्रात केवळ 1 विकेट गमावली. सध्या संघाच्या हातात 9 विकेट्स आहेत. पहिले सत्र संपल्यानंतर टीम इंडियाची धावसंख्या 84 षटकांत 275/1 अशी आहे. भारताने 321 धावांची आघाडी घेतली आहे. यशस्वी जैस्वाल 12 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 141 धावा करून खेळत आहे तर देवदत्त पडिक्कल 2 चौकारांच्या मदतीने 25 धावा करत खेळत आहे.
INDIA 275/1 ON DAY 3 LUNCH.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 24, 2024
- The lead is 321 runs, Jaiswal 141* (264) and Padikkal 25* (70) at the crease. What a session by India! 🇮🇳 pic.twitter.com/EZGBSjIjr5
23 वर्षापूर्वी एका वर्षात सर्वाधिक कसोटी शतके (भारत)
4 शतके - सुनील गावस्कर, 1971
4 शतके - विनोद कांबळी, 1993
3 शतके - रवी शास्त्री, 1984
3 शतके - सचिन तेंडुलकर, 1992
3 शतके - यशस्वी जैस्वाल, 2024
दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेली टीम इंडिया 150 धावांत गारद झाली. पण त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजीने चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा डाव 104 धावांत गुंडाळला आणि 46 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी शानदार फलंदाजी करत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही गडी न गमावता 172 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गडगडला-
ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 104 धावांवर गडगडला. मिचेल स्टार्कने सर्वाधिक 26 धावा केल्या. सलामीवीर उस्मान ख्वाजा 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅकस्वीन 10 धावा तर लॅबुशेन 2 धावा करून करून बाद झाले. स्टीव्ह स्मिथला खातेही उघडता आले नाही. ट्रॅव्हिस हेड 11 धावा करून बाद झाला. मिचेल मार्श 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारतीय गोलंदाजांनी केला कहर
बुमराहने भारतासाठी घातक गोलंदाजी केली. त्याने 5 विकेट घेतल्या. बुमराहने 18 षटकात 30 धावा दिल्या. हर्षित राणाने 3 बळी घेतले. त्याने 15.2 षटकात 48 धावा दिल्या. मोहम्मद सिराजने 2 बळी घेतले. त्याने 13 षटकात 20 धावा दिल्या. नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना एकही विकेट मिळाली नाही.