(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारताच्या विजयाचे 5 शिल्पकार; कुलदीपची फिरकी, बुमराहचा भेदक मारा अन् हार्दिकचा अष्टपैलू टच!
T20 World Cup 2024 IND vs BAN : भारताचा सुपर 8 मधील अखेरचा सामना सोमवारी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. बांगलादेशविरोधात विजय मिळवला, पण भारताच्या विजायाचे पाच शिल्पकार कोणते पाहूयात...
T20 World Cup 2024 IND vs BAN: भारताने टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलचं तिकीट पक्कं केलंय. सुपर एटच्या दुसऱ्या सामन्यात भारताने आज बांगलादेशचा ५० धावांनी दणदणीत पराभव केला. भारताच्या 197 धावांच्या आव्हानाला उत्तर देताना बांगलादेशला भारताने 8 बाद 146 असं रोखलं. कुलदीप यादवने तीन तर अर्शदीप आणि बुमराने प्रत्येकी दोन विकेट्स घेत बांगलादेशी फलंदाजीचं कंबरडं मोडलं. त्याआधी बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. मग भारतीय फलंदाजांनी धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. हार्दिक पंड्यानं अवघ्या 27 चेंडूंत नाबाद 50 धावांची धडाकेबाज खेळी उभारली. त्याच्या अर्धशतकाला चार चौकार आणि तीन षटकारांचा साज होता. कर्णधार रोहित शर्मानं 23, विराट कोहलीनं 37, रिषभ पंतनं 36 आणि शिवम दुबेनं 34 धावांची खेळी केली. त्यामुळंच भारताला 20 षटकांत पाच बाद 196 धावांची मजल मारता आली. भारताचा सुपर 8 मधील अखेरचा सामना सोमवारी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. बांगलादेशविरोधात विजय मिळवला, पण भारताच्या विजायाचे पाच शिल्पकार कोणते पाहूयात...
1. हार्दिक पांड्या
प्रथम फलंदाजी करताना भारतानं 196 धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. पण हार्दिक पंड्यानं केलेलं अर्धशतक निर्णायक ठरलं. हार्दिक पांड्याने अवघ्या 27 चेंडूंत नाबाद 50 धावांची धडाकेबाज खेळी उभारली. त्याच्या अर्धशतकाला चार चौकार आणि तीन षटकारांचा साज होता. हार्दिक पांड्याने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत भारताची धावसंख्या 190 पार पोहचवली. त्याशिवाय गोलंदाजीत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. अष्टपैलू खेळीमुळे हार्दिक पांड्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलेय.
2. कुलदीप यादव
कुलदीप यादवच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशचे फलंदाज फेल ठरले. कुलदीपने चार षटकात फक्त 19 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. कुलदीप यादवने बांगलादेशच्या आघाडीच्या फलंदाजांना बाद करत भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला.
3. जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराह यानं पॉवरप्लेमध्ये बांगलादेशच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक निर्धाव चेंडू टाकले. बुमराहने पॉवरप्लमध्ये दोन षटकं फेकली, त्यामध्ये त्यानं फक्त सहा धावा खर्च केल्या. त्याच्या गोलंदाजीवर एकही चौकार-षटकार गेला नाही. बुमराहने आपल्या चार षटकात फक्त 13 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. बुमराहने बांगलादेशच्या फलंदाजावर निर्धाव चेंडूचा दबाव वाढवला.
4. ऋषभ पंत/शिवम दुबे
ऋषभ पंत आणि शिवम दुबे यांनी मधल्या षटकात धावगती वाढवण्याचं काम केले. पंतने विराट कोहलीसोबत मोलाचा भागिदारी केली. पंत चुकीचा फटका मारत बाद झाला, पण त्यानं आपलं काम चोख बजावलं. पंतने 24 चेंडमध्ये दोन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 36 धावांचं योगदान दिले. तर शिवम दुबे यानं हार्दिक पांड्यासोबत महत्वाची अर्धशतकी भागिदारी केली. दुबे यानं आपल्या वादळी खेळीमध्ये तीन षटकार ठोकले. त्याने 24 चेंडूमध्ये 34 धावांचे योगदान दिले.
5. विराट कोहली
विश्वचषक जसाजसा उत्तार्धाकडे जातोय, तशी विराट कोहलीच्या बॅटमधून धावा निघत आहेत. विराट कोहलीनं पाचव्या सामन्यानंतर 30 धावसंख्या ओलांडली आहे. विराट कोहलीनं रोहित शर्मासोबत आक्रमक सुरुवात केली. त्यानंतर मधल्या षटकात धावांचा पाऊस पाडला. विराट कोहलीने 28 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये विराट कोहलीने तीन खणखणीत षटकार ठोकले.