(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND W vs ENG W: भारतीय महिला क्रिकेट संघ फायनलमध्ये दाखल, रोमहर्षक सामन्यात इंग्लंड पराभूत, विजयासह पदकही निश्चित
IND W vs ENG W: भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामना खेळला. इंग्लंडवर 4 धावांनी रोमहर्षक विजय मिळवत भारतीय महिला फायनलमध्ये दाखल झाल्या आहेत.
IND W vs ENG W : भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ (India vs England) यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समधील सेमीफायनलच्या सामन्यात भारत विजयी झाला आहे. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात 4 धावांनी विजय मिळवत भारतीय महिला थेट फायनलमध्ये पोहोचल्या असून भारताचं किमान पदकही यावेळी निश्चित झालं आहे.
कॉमनवेल्थमध्ये प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश झाला असताना भारतीय महिलांनी पदकही निश्चित केलं आहे. आधी फलंदाजी करत भारताने इंग्लंडसमोर 165 धावांचं आव्हान ठेवलं, जे पार करताना इंग्लंडचा संघ 20 षटकात 160 धावाच करु शकला आणि भारत विजयी झाला.
सामन्याचा लेखाजोखा
सामन्यात सर्वप्रथम भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सलामीवीर स्मृती मंधानाने दमदार अशी सुरुवात करुन देत अर्धशतक झळकावलं. तिच्या 61 धावा भारतासाठी महत्त्वाच्या ठरल्या. शेफाली 15 धावा करुन बाद झाली पण आधीच्या सामन्यात चमकलेल्या जेमिमाने नाबाद 44 धावा करत महत्त्वपूर्ण कामगिरी केली. याशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौरने 20 तर दिप्ती शर्माने 22 धावा केल्या. ज्यांच्या मदतीने भारताने 164 धावा स्कोरबोर्डवर लावल्या
165 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडच्या कोणत्याच खेळाडूंना नीट टिकून खेळता आलं नाही. सतत विकेट्स पडत असल्यामुळे त्यांना 165 धावा 20 षटकात करता आल्या नाही. इंग्लंडकडून कर्णधार नटॅलीने सर्वाधिक 41 धावा केल्या. इतर फलंदाजांना टिकून खेळता न आल्याने 20 षटकात इंग्लंड 6 गडी गमावून 160 धावाच करु शकला ज्यामुळे भारताचा 4 धावांनी विजय झाला.
फायनलची लढत कोणाशी?
याच विजयासह भारतीय संघाने थेट फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. आता काही वेळात फायनलमध्ये जाणारा दुसरा संघ कोण हे समोर येईल. कारण न्यूझीलंडचा महिला संघ आणि ऑस्ट्रेलियाचा महिला संघ यांच्यातील विजेता संघ फायनलमध्ये जाणार आहे. त्यामुळे भारत फायनलमध्ये कोणाशी भिडणार हे अजून स्पष्ट व्हायचे आहे.
हे देखील वाचा-