IND vs ZIM : टी20 मध्ये जाडेजाची जागा कोण घेणार? सुंदरचं नाव सर्वात पुढे
Washington Sundar Team India: वाशिंगटन सुंदर सध्या शानदार फॉर्मात आहे. रवींद्र जाडेजाच्या जागी टी20 संघात तो स्थान मिळवू शकतो. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये तो मोलाचं योगदान देऊ शकतो.
Washington Sundar Team India : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये सध्या पाच सामन्याची टी20 मालिका सुरु आहे. यामध्ये भारताचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर शानदार कामगिरी करत आहे. हरारे येथे झालेल्या तिन्ही सामन्यात त्याने प्रभावी मारा केला आहे. सुंदरने तीन सामन्यांत 6 विकेट घेतल्या आहेत. सुंदर गोलंदाजीसोबत फलंदाजीतही तरबेज आहे. टीम इंडियामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून सुंदर रवींद्र जडेजाची जागा घेऊ शकतो.
टी20 विश्वचषकावर टीम इंडियाने नाव कोरल्यानंतर रवींद्र जाडेजाने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर भारतीय संघाला दर्जेदार अष्टपैलूची गरज आहे. त्याची जागा घेण्यासाठी सध्या अनेकजण स्पर्धेत आहे. त्यामध्ये सर्वात पुढे वॉशिंग्टन सुंदर याचं नावं आहे. त्याच कारणामुळे सुंदरला झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली होती. सुंदरने आतापर्यंत या मालिकेतील सर्व सामने खेळले आहेत. कदाचित तो उर्वरित दोन सामनेही खेळेल. या मालिकेत सुंदरने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले.
झिम्बाब्वेविरोधात शानदार प्रदर्शन -
झिम्बाब्वे आणि भारत यांच्यामध्ये पाच सामन्याची टी20 मालिका सुरु आहे. टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. या मालिकेत भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने शानदार कामगिरी केली आहे. टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने 11 धावांत 2 बळी घेतले होते. यासह त्याने 27 धावाही केल्या. सुंदरने दुसऱ्या सामन्यात 1 तर तिसऱ्या सामन्यात 3 बळी घेतले. मात्र, या दोन्ही सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. सुंदर हा उजव्या हाताचा ऑफब्रेक गोलंदाज करतो.
वॉशिंग्टन सुंदरचं आंतरराष्ट्रीय करिअर -
वॉशिंग्टन सुंदर टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मेट खेळला आहे. त्याने चार कसोटी सामन्यात सहा विकेट घेतल्या आहेत, त्यासोबतच 265 धावाही केल्या आहेत. सुंदरने 19 एकदिवसीय सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. वनडेमध्ये त्याने 265 धावाही केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 46 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये 40 विकेट घेतल्या आहेत. 15 धावांत 3 बळी घेणे ही सुंदरची टी-20 सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे.