Virat Kohli's ODI Record: 102 धावा अन् विराटच्या नावावर मोठा विक्रम, सचिनला टाकणार मागे
Virat Kohli's ODI Record: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिल्या वनडे सामन्याला सुरुवात झाली आहे.
Virat Kohli's ODI Record: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिल्या वनडे सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. वनडेमध्ये 13 हजार धावांचा माईलस्टोन पार करण्यासाठी विराट कोहलीला फक्त 102 धावांची गरज आहे. आजच्या सामन्यात विराट कोहलीने हा पराक्रम केला तर सर्वात वेगात 13 हजार धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा होणार आहे. सचिन तेंडुलकरला हा पल्ला पार करण्यासाठी 321 डावांची गरज लागली होती. विराट कोहली 265 डावात हा पल्ला पार करणारा खेळाडू होईल.
विराट कोहली वनडेमध्ये सर्वात जलद धावा करणारा फलंदाज बनण्याची ही पहिलीच वेळ ठरणार नाही. याआधी 12 हजार धावांचा आकडाही कोहलीने सर्वात जलद पार केला होता. त्याच वेळी, कोहली सर्वात वेगवान 8,000, सर्वात वेगवान 9,000, सर्वात वेगवान 10,000 आणि सर्वात जलद 11,000 धावा करणारा फलंदाज आहे. आता तो सर्वात जलद 13,000 धावा करणारा फलंदाज होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी त्याला फक्त 102 धावांची गरज आहे. या मालिकेत विराट कोहली हा पल्ला पार करु शकतो.
विराट कोहली आतापर्यंत 274 वनडे खेळला आहे. या सामन्यांच्या 265 डावांमध्ये त्याने 57.32 च्या सरासरीने 12898 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 46 शतके आणि 56 अर्धशतके झळकली आहेत. वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत सचिन तेंडुलकर 49 शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
विराट-रोहित आणखी एक विक्रम करणार ?
Virat Kohli - Rohit Sharma as a pair in ODI: रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने वनडेमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. या जोडीला आणखी एक विक्रम करण्याची संधी असेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने दोन धावांची भागिदारी केल्यास पाच हजार धावा पूर्ण करणार आहेत. या जोडीने 85 डावात आतापर्यंत 4998 धावा केल्या आहेत. 18 शतकी भागिदारी आणि 15 अर्धशतकी भागिदारी या जोडीच्या नावावर आहेत.
विराट कोहलीचे करिअर कसे राहिलेय ?
माजी कर्णधार विराट कोहलीने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विराट कोहलीने आतापर्यंत 274 वनडे सामन्यात 57.32 च्या सरासरीने 12898 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये 46 शतके आणि 65 अर्धशतकांचा समावेश आहे. 111 कसोटी सामन्यात विराट कोहलीने 29 शतकांच्या मदतीने 8676 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याने 29 अर्धशतकेही ठोकली आहेत. टी 20 मध्ये विराट कोहलीची बॅट तळपली आहे. 115 टी 20 सामन्यात विराट कोहलीने 4008 धावा चोपल्या आहेत, यामध्ये एक शतक आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. टी 20 मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर आहे.