IND vs USA : अर्शदीपनं वात पेटवत अमेरिकेला धक्के दिले, नितीश कुमारची कडवी झुंज, भारतापुढं किती धावांचं आव्हान?
IND vs USA : भारत आणि अमेरिका यांच्यात टी 20 वर्ल्ड कपमध्ये 25 वी मॅच सुरु आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये ही मॅच होत आहे.
न्यूयॉर्क : भारत आणि अमेरिका (IND vs USA) यांच्यात न्यूयॉर्कमध्ये टी 20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) मध्ये 25 वी मॅच सुरु आहे. भारताचा कॅप्टन रोहित शर्मा यानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनं (Arshdeep Singh) अमेरिकेला पहिल्याच ओव्हरमध्ये दोन धक्के दिले. टेलर, नितीश कुमार, कोरी अँडरसन यांच्या चिवट फलंदाजीच्या जोरावर अमेरिकेनं पलटवार केला. अमेरिकेनं भारतासमोर विजयासाठी 111 धावांचं आव्हान ठेवलं.
अर्शदीप सिंगनं पहिल्याच बॉलवर जहांगीरला बाद केलं. यानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये अँड्रीस गाऊसला अर्शदीप सिंगनं 2 धावांवर बाद केलं. अमेरिकेच्या एका बाजूनं विकेट पडत होत्या. स्टीवन टेलरनं 24 धावा केल्या. अरोन जोन्सला हार्दिक पांड्यानं 11 धावांवर बाद केलं. यानंतर नितीश कुमारनं अमेरिकेचा डाव सावरला. नितीश कुमारनं 27 धावा केल्या. नितीश कुमार आणि कोरी अँडरसनची भागिदारी होत असताना अर्शदीप सिंगनं पुन्हा एकदा रोहित शर्माचं टेन्शन कमी केलं. नितीश कुमारला 27 धावांवर अर्शदीप सिंगनं बाद केलं. मोहम्मद सिराजनं सीमारेषेजवळ अफलातून कामगिरी करत कॅच घेतला. कोरी अँडरसननं 15 धावा केल्या. अमेरिकेनं 8 विकेटवर 110 धावा केल्या.
अमेरिकेची चिवट फलंदाजी
भारताकडून अर्शदीप सिंगनं पहिल्याच ओव्हरमध्ये दोन धक्के दिल्यानंतरही अमेरिकेनं धावा सुरुच ठेवल्या. विशेष बाब म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये बाद झालेले दोन फलंदाज वगळता इतर सर्वांनी किमान एक षटकार मारला. आक्रमक फलंदाजी करत भारतानं निर्माण केलेला दबाव झुगारण्याचा प्रयत्न अमेरिकेच्या फलंदाजांनी केला.
भारताकडून अर्शदीप सिंगनं दमदार गोलंदाजी केली. त्यानं चार विकेट घेतल्या. हार्दिक पांड्यानं 2 तर अक्षर पटेलनं एक विकेट घेतली. टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे.
भारताचा संघ :
रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दूबे, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा,मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
अमेरिकेचा संघ :
अरोन जोन्स (कॅप्टन), स्टीवन टेलर, शयन जहांगीर, अँड्रीस गवस (विकेट कीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन,हरमीत सिंग, शॅडली वॅन शाल्कवायक,जसदीप सिंग,सौरभ नेत्रावळकर, अली खान
दरम्यान, आजच्या मॅचमध्ये जो संघ विजयी होईल त्यांना सुपर 8 चं तिकीट मिळणार आहे. भारतानं विजय मिळवल्यास त्यांचं सुपर 8 मधील स्थान निश्चित होईल.
संबंधित बातम्या :