(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA 3rd: भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकला दक्षिण अफ्रिकेचा संघ; अवघ्या 99 धावांवर ऑलआऊट!
IND vs SA 3rd: भारतीय फिरकीपटूंच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं.
IND vs SA 3rd: भारतीय फिरकीपटूंच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी (India vs South Africa) लोटांगण घातलं. दिल्लीच्या (Delhi) अरूण जेटली (Arun Jaitley Stadium) येथे सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 99 धावांवर ऑलआऊट झालाय. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून हेनरीक क्लासेननं सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. या निर्णायक सामन्यांत भारतीय गोलंदाजांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडलीय. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज कशी कामगिरी बजावतात? हे पाहणं महत्वाचं ठरेल.
भारतीय फिरकीपटूंची चमकदार गोलंदाजी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखरेचा सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळला जातोय. या सामन्यात भारताचा कर्धणार शिखर धवननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं अक्षरशः गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकेचा संघ 27.1 षटकांत अवघ्या 99 धावांवर ढेपाळला. भारताकडून चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि शाहबाज अहमद यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.
तीन सामन्यात तीन नवे कर्णधार
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघ तीन वेगवेगळ्या कर्णधाराच्या नेतृत्वात मैदानात उतरला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात नियमित कर्णधार टेम्बा बावुमानं दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व केलं होतं, जो सामना भारतानं गमावला होता. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केशव महाराजच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. तर, एकदिवसीय सामन्यात डेव्हिड मिलरच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 99 धावांवर ऑलआऊट झाला आहे. अद्याप या सामन्याचा निकाला लागला नाही.
भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान, वॉशिंग्टन सुंदर.
दक्षिण आफ्रिका संघ:
जनेमान मलान, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, हेनरीक क्लासेन, डेविड मिलर (कर्णधार), एनरिक नॉर्टेजे, लुंगी इंगिडी,मार्को यॅन्सन, आंदिले फेहलुकवायो आणि ब्योर्न फॉर्च्युइन.
हे देखील वाचा-