Gautam Gambhir On Jay Shah: काल पाकिस्तानला पुन्हा लोळवलं; आज गौतम गंभीरचं जय शाह यांच्यासाठी ट्विट, काय म्हणाला?
Gautam Gambhir On Jay Shah: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील सुपर-4 मध्ये काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला.

Gautam Gambhir On Jay Shah: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील सुपर-4 मध्ये काल (21 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने गुणतालिकेत 2 गुणांसह अव्वल स्थानही पटकावले आहे. तसेच या स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर मिळवलेला सलग दुसरा विजय ठरला. दरम्यान, आज भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने एक्सवर पोस्ट करत आयसीसीचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांचा आज 37 वा वाढदिवस आहे. जय शाह यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम गंभीरने पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. खेळाच्या भरभराटीसाठी तुमचा हेतू आणि अथक प्रयत्न येणाऱ्या पिढ्यांसाठी कायमचा प्रभाव असेल, असं गौतम गंभीरने या पोस्टद्वारे म्हटलं आहे.
Many many happy returns of the day @JayShah. Your intent and relentless efforts towards making the game flourish will leave a lasting impact for generations to come! pic.twitter.com/6j8nvMdBhr
— Gautam Gambhir (@GautamGambhir) September 22, 2025
कोण आहे जय शाह? (Who Is Jay Shah)
जय शाह हे एक भारतीय क्रिकेट प्रशासक आणि व्यावसायिक आहेत. जय शाह डिसेंबर 2024 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष आहेत आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष होते. जय शाह भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव होते. जय शाह यांनी अहमदाबादमधील निरमा विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे.
भारताचा पाकिस्तानवर विजय- (Team India Win Over Pakistan)
पाकिस्ताननं भारतासमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतानं हे आव्हान आरामात पार केलं. अभिषेक शर्मानं 39 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 74 धावा फटकावल्या. तर शुभमन गिलनं 47 धावांचं योगदान दिलं. या दोघांनी 105 धावांची सलामी देत भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मानं विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. दरम्यान, पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक 58 धावा केल्या. तर फखर जमानने 15, सईम अयुबने 21, मोहम्मद नवाजने 21, सलमान आगाने 17 आणि फहीम अश्रफने 20 धावा केल्या. भारताकडून शिवम दुबेने 2 विकेट्स पटकावल्या. तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाल्या.




















