भारत अन् न्यूझीलंड उपांत्य सामन्यात प्लेईंग 11 मध्ये बदल करणार? पाहा संभाव्य शिलेदार
IND vs NZ, World Cup Semi-Final Live : विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना आज होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ वानखेडेच्या मैदानावर आमनेसामने असतील.
IND vs NZ, World Cup Semi-Final Live : विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना आज होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ वानखेडेच्या मैदानावर आमनेसामने असतील. विजेत्या संघाला फायनलचं तिकिट मिळणार आहे. तर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक मानली जाते. त्यामुळं नाणेफेकीचा कौल जिंकणारा संघ वानखेडेवर पहिल्यांदा फलंदाजी घेणं पसंत करतो.सामन्यात यजमान भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी होणार आहे. विश्वचषकाच्या साखळीत धर्मशालामध्ये झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला चार विकेट्सनी हरवलंय. पण म्हणून न्यूझीलंडच्या आव्हानाला कमी लेखता येणार नाही. कारण केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघात कमालीची गुणवत्ता आहे. याच न्यूझीलंडनं 2019 सालच्या विश्वचषकात भारताला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळं त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी रोहित शर्माच्या भारतीय संघाला आज वानखेडे स्टेडियमवर मिळणार आहे.
भारतीय संघ यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत अजेय आहे. साखळी सामन्यात नऊपैकी नऊ सामने जिंकले होते. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर आपली ताकद दाखवून दिली आहे. न्यूझीलंडच्या खात्यात नऊपैकी पाच सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये पराभव अशी कामगिरी आहे. साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केलाय. आजच्या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जातेय.
पाच सामन्यात भारताची प्लेईंग 11 सेम -
अखेरच्या पाच साखळी सामन्यात भारताची प्लेईंग 11 सेम आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. संघात वारंवार बदल केल्यामुळे याआधीच्या काही आयसीसीच्या स्पर्धेत भारताला फटका बसला होता. त्यामुळे भारताने ही चूक यंदा तरी टाळली आहे. याच फॉर्मुल्यासह भारतीय संघ आज मैदानात उतरु शकतो. म्हणजे, वानखेडेच्या मैदानावर भारतीय संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. मागील सामन्यातील विजयी संघच मैदानात उतरेल, अशी शक्यता आहे.
भारतीय संघ फॉर्मात -
भारतीय संघा यंदाच्या विश्वचषकात फॉर्मात आहे. साखळीच्या नऊ सामन्यात विजय मिळवत निर्वादित वर्चस्व सिद्ध केलेय. अनचेंज प्लेईंग 11 सह भारताने मागील पाच सामन्यात विजय मिळवलाय. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीतही भारताने शानदार कामगिरी केली आहे. फिरकी आणि वेगवान मारा प्रभावी आहे. त्यामुळे आज भारतीय संघात कोणताही बदल होईल, असे वाटत नाही.
भारताची संभाव्य प्लेईंग 11 : रोहित शर्मा (कप्तान), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंडचे सर्व खेळाडू तंदुरुस्त -
सेमीफायनलपूर्वी न्यूझीलंडचे सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत. विश्वचषकात खेळाडूच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडच्या संघाला फटका बसला. कर्णधार केन विल्यमसन, लॉकी फर्गुसन यांना दुखापतीमुळे काही सामन्याला मुकावे लागले होते. त्याशिवाय मार्क चॅपमॅन आणि मॅट हेनरी यांनाही दुखापतीमुळे फटका बसला होता. मॅट हेनरीच्या जागी काइल जेमिसन याला संधी मिळाली आहे. तरीही न्यूझीलंडच्या संघात फार बदल होतील, असे वाटत नाही.
न्यूझीलंडची संभाव्य प्लेईंग 11 -
डेवोन कॉनवे, रचिन रविंद्र, केन विलियमसन (कर्णधार), डेरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चैपमैन, मिचेल सेंटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट.