(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs NZ 2nd Test: टीम इंडियाचा असाही विक्रम; कसोटीत सर्वात मोठ्या विजयाची नोंद
IND vs NZ 2nd Test: माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 2015 मध्ये दक्षिण अफ्रिकाविरुद्ध 337 धावांनी विजय मिळवला होता.
IND vs NZ 2nd Test: मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) रंगलेल्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतानं न्यूझीलंडला (IND Vs NZ) तब्बल 372 धावांनी पराभूत केलंय. न्यूझीलंडला 372 धावांनी पराभूत करून भारतानं सर्वात मोठ्या विजयाची नोंद केलीय. माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 2015 मध्ये दक्षिण अफ्रिकाविरुद्ध 337 धावांनी विजय मिळवला होता. हा सामना दिल्लीत खेळण्यात आला होता.
भारताचा सर्वात मोठा विजय
भारतीय क्रिकेट संघानं 2008 साली मोहालीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या संघाला 320 धावांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर 2016 साली न्यूझीलंडविरुद्ध इंदौर येथे खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात भारतानं 321 धावांनी विजय मिळवला होता.
न्यूझीलंडचा सर्वात मोठा पराभव
दुसरीकडे, न्यूझीलंडचा कसोटी क्रिकेटमधला हा सर्वात मोठा पराभव ठरला. न्यूझीलंडनं दुसऱ्या कसोटीत खराब फलंदाजी केली. त्यांनी पहिल्या डावात 62 आणि दुसऱ्या डावात 167 धावा केल्या. ज्यामुळं त्यांच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद झालीय. न्यूझीलंडचा कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी, दक्षिण अफ्रिकेच्या संघानं न्यूझीलंडला 358 धावांनी पराभूत केलं होतं. हा सामना जोहान्सबर्ग येथे खेळण्यात आला होता.
मयंक अग्रवाल ठरला सामानावीर
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघानं दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशी जिंकून भारतानं घरच्या मैदानावर सलग 14वी कसोटी मालिका जिंकली. पहिल्या डावात 150 धावा आणि दुसऱ्या डावात 62 धावांची खेळी करणारा मयंक अग्रवाल सामनावीर ठरला.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-