फिरकीच्या जाळ्यात इंग्लंड अडकला, कुलदीपनं पाच फलंदाजांना पाठवलं तंबूत
IND vs ENG : धर्मशाला कसोटी सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवच्या जाळ्यात इंग्लंडचा संघ अडकलाय. चांगल्या सुरुवातीनंतर इंग्लंडचा डाव गडगडला.
IND vs ENG : धर्मशाला कसोटी सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवच्या जाळ्यात इंग्लंडचा संघ अडकलाय. चांगल्या सुरुवातीनंतर इंग्लंडचा डाव गडगडला. कुलदीप यादवने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. इंग्लंडने 183 धावात सात विकेट गमावल्या आहेत. इंग्लंड आणि भारत यांच्यातील अखेरचा कसोटी सामना धर्मशालाच्या मैदानावर सुरु आहे. भारताने ही मालिका आधीच3-1 ने खिशात घातली आहे. आता अखेरचा सामना जिंकून टीम इंडिया 4-1 ने आघाडी घेण्यासाठी मैदानात उतरली आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ शेवट गोड करण्यासाठी प्रयत्नशील असेल. पण भारतीय गोलंदाजांच्या जाळ्यात इंग्लंडचा संघ अडकलाय.
कुलदीप यादव यानं भेदक मारा करत इंग्लंडचं कंबरडं मोडलेय. कुलदीप यादव यानं इंग्लंडचे आघाडीचे फलंदाज तंबूत धाडले. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने सावध सुरुवात केली होती. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचा भेदक मारा सक्षमपणे पेलला. बेन डकेट आणि जॅक क्रॉली मोठी धावसंख्या उभारणार असेच वाटत होते. पण कुलदीप यादव यानं ही जोडी फोडली. कुलदीप यादव यानं 64 धावांवर इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर ठरावीक अंतरानं इंग्लंडच्या विकेट गेल्या.
कुलदीप यादवनं पहिल्यांदा बेन डकेट याला तंबूत पाठवलं. बेन डकेट 27 धावांवर बाद झाला. त्यानंतर ओली पोप 11 धावांवर तंबूत परतला. जो रुट आणि जॅक क्रॉली यांनी संघर्ष केला. त्यांची जोडी जमली असेच वाटत होते. पण कुलदीप यादव यानं पुन्हा एकदा इंग्लंडला धक्का दिला. कुलदीप यादव यानं जॅक क्रॉली याला 79 धावांवर तंबूत पाठवलं. त्यानंतर जॉनी बेअरस्टो याला कुलदीप यादव यानं तंबूचा रस्ता दाखवला. जॉनी बेअरस्टो यानं 29 धावांचं योगदान दिलं. कुलदीप यादव यानं इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला खातेही उघडू दिले नाही. स्टोक्स शून्यावर तंबूत परतला. रवींद्र जाडेजानं जो रुट याचा अडथळा दूर केला. जो रुट 26 धावांवर बाद झाला. आर. अश्विन यानं टॉम हर्टली याला 6 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला.
कुलदीप यादवने 15 षटकात 72 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. तर रवींद्र जाडेजानं सात षटकात 14 धावा खर्च करत एक विकेट घेतली. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आर. अश्विन यांनीही भेदक मारा केला. त्यांना विकेट मिळवण्यात अद्याप अपयश आलेय.
इंग्लंडकडून जॅक क्रॉली यानं संघर्ष केला. त्यानं 108 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 79 धावांची खेळी केली. त्याशिवाय बेन डकेट 27, ओली पॉप 11, जो रुट 26, जॉनी बेअरस्टो 29 , बेन स्टोक्स आणि टॉप हार्ट्ले यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.