IND vs ENG 2nd Test : इंग्लंडकडून दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर, चार वर्षानंतर वेगवान गोलंदाजाचं कमबॅक, आर्चरला संधी, कुणाला डच्चू?
IND vs ENG 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी 2 जुलैपासून सुरु होणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंडकडून संघ जाहीर करण्यात आला आहे.

बर्मिंघम: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी 2 जुलैपासून सुरु होणार आहे. दुसऱ्या कसोटीला अजून बराच वेळ असला तरी इंग्लंडकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडनं दुसऱ्या कसोटीसाठी 15 सदस्यांच्या संघाची घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात जोफ्रा आर्चरचं कमबॅक झालं आहे. जोफ्रा आर्चर तब्बल चार वर्षानंतर या कसोटीच्या माध्यमातून कमबॅक करेल. दुसरी कसोटी बर्मिंघमच्या एजबेस्टनमध्ये होणार आहे.
इंग्लंडनं केवळ दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर केला आहे. मालिकेतील उर्वरित तीन कसोटीसाठी संघ नंतर जाहीर केला जाईल. यापूर्वी इंग्लंडनं पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर केला केला होता. इंग्लंडनं दुसऱ्या कसोटीसाठी आता जोफ्रा आर्चरला संघात स्थान दिलं आहे.
4 वर्षानंतर जोफ्रा आर्चरचं कमबॅक
जोफ्रा आर्चरनं फेब्रुवारी 2021 मध्ये शेवटची कसोटी खेळली होती. त्यानंतर आता तो आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळणार आहे. दरम्यानच्या काळात आर्चरनं काऊंटी चॅम्पियनशिपच्या अखेरच्या टप्प्यात ससेक्सकडून डरहम विरुद्ध चांगली कामगिरी केली होती.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ :बेन स्टोक्स (कॅप्टन ), जोफ्रा आर्चर, शोएब बशीर, जॅकब बेथल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओवर्टन, ओली पोप, जो रुट, जेमी स्मिथ, जोश टंग आणि क्रिस वोक्स.
पहिल्या कसोटीत इंग्लंडचा विजय
लीडसमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. लीडस कसोटीत भारतानं पहिल्या डावात 471 धावा केल्या. पहिल्या डावात यशस्वी जयस्वालनं 101, शुभमन गिलनं 147 आणि रिषभ पंतनं 134 धावा केल्या होत्या. इंग्लंडनं पहिल्या डावात 465 धावा केल्या होत्या. . इंग्लंडच्या ओली पोपच्या 106 आणि हॅरी ब्रुकच्या 99 धावांमुळं इंग्लंडनं विजय मिळवला. भारताच्या दुसऱ्या डावात केएल राहुल आणि रिषभ पंत यांनी शतकं केली होती. रिषभ पंतनं 118 तर केएल राहुलनं 137 धावा केल्या होत्या. भारतानं दुसऱ्या डावात 364 धावा केलेल्या. इंग्लंडला विजयासाठी 371 धावा करायच्या होत्या. बेन डकेट यानं 149 रन आणि जॅक क्रॉली यानं 65 धावा केल्या होत्या. जो रुटनं नाबाद 53 धावा केल्या.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील तिसरी कसोटी 10 जुलै ते 14 जुलै दरम्यान होईल. तिसरी कसोटी लॉर्डस्वर होईल. चौथी कसोटी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होईल. ही कसोटी 23 ते 27 जुलै या दरम्यान होईल. पाचवी कसोटी द ओवल मैदानावर मॅच 31 जुलै ते 4 ऑगस्ट या दरम्यान होईल.





















